काेंढाळी : भरधाव कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव-डाेरली मार्गावरील धनकुंड शिवारात साेमवारी (दि. २८) दुपारी घडली.
शरद दिवाकर कुंभरे (२२, रा. डाेरली) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. शरद एमएच-४०/बीबी-११५३ क्रमांकाच्या माेटरसायकलने डाेरलीहून बाजारगावकडे जात हाेता. ताे धनकुंड शिवारात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/सीआर-३९९६ क्रमांकाच्या कारने त्याच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात शरदला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि जखमी शरदला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. अपघात हाेताच चालकाने कार घटनास्थळीच साेडून पळ काढला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी कार ताब्यात घेत जप्त केली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून कारचालकाचा शाेध सुरू केला आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राम ढगे करीत आहेत.