लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भरधाव पिकपन व्हॅनने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका मुख्याध्यापकासह दोघांचा करुण अंत झाला. संजय चिंतामणराव बोंद्रे (वय ४३) आणि आशुतोष बाबुभाई खत्री (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास चिखली चाैकात हा अपघात घडला.
कैलासनगरात राहणारे बोंद्रे मुख्याध्यापक होते. ते आणि त्यांचे मित्र सिव्हील कंत्राटदार खत्री हे दोघे दुचाकीने भाजी घेण्यासाठी कळमना मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास दुचाकीने जात होते. त्यांना चिखली चाैकात पिक व्हॅन (एमएच ३२- क्यू ५५३२) च्या चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बोंद्रे आणि खत्री यांचा करुण अंत झाला. या अपघातानंतर चिखली चाैकात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस उपनरीक्षक मुकुंद जाधव, सहायक निरीक्षक डोंगरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी व्हॅनचालक आरोपी अशोक रोशनलाल विश्वकर्मा याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.