जरीपटक्यात दरोडा घालणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:13+5:302021-07-07T04:10:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ज्वेलर्समध्ये सोमवारी भरदुपारी दरोडा घालून पोलिसांना आव्हान देणाऱ्या दरोडेखोरांचा शहर ...

जरीपटक्यात दरोडा घालणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ज्वेलर्समध्ये सोमवारी भरदुपारी दरोडा घालून पोलिसांना आव्हान देणाऱ्या दरोडेखोरांचा शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल ऑपरेशन करून चारपैकी दोन दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या, तर वाहन सोडून कटनी-जबलपूरजवळच्या जंगलात पळून गेलेल्या दोन दरोडेखोरांचा पोलिसांची विविध पथके शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी सोमवारी दुपारपासून मंगळवार पहाटेपर्यंत सलग सक्रिय राहून दरोड्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे नवीनचंद्र रेड्डी, सुनील फुलारी आणि डॉ. दिलीप झळके हे तीनही अतिरिक्त पोलीस आयुक्त, तसेच पोलीस उपायुक्त विनीता साहू, उपायुक्त निलोत्पल, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि उपायुक्त नुरूल हसन हजर होते.
जरीपटक्यातील भीम चाैकाजवळ असलेल्या अवनी ज्वेलर्समध्ये सोमवारी दुपारी २.१५ वाजता तीन दरोडेखोर शिरले. त्यांनी आतून शटर लावून घेत ज्वेलर्सचे संचालक आशीष रवींद्र नावरे (वय ३५, रा. ठवरे कॉलनी) यांचा गळा दाबला. दुसऱ्याने पिस्तूल कानशिलावर ठेवले. मारहाण करून त्यांच्या तोंडावर टेपपट्टी चिकटवून त्यांचे हात-पाय बांधले आणि तिजोरीतील साडेतीन लाखांची रोकड, ३०० ग्रॅम सोन्याचे तसेच १० किलो चांदीचे दागिने असा एकूण २० लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.
---
(१)
८२ सीसीटीव्हीचे फुटेज तपासले
भरदुपारी वर्दळीच्या भागात दरोडा घालून दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हानच दिले होते. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा तपासासाठी कामी लावण्यात आली. दरोड्याचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला होता. तो धागा पडकून ज्या मार्गाने दरोडेखोर दुचाकीने पळाले, त्या मार्गावरील ८२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यातून आरोपी मनसर-देवलापार मार्गे मध्य प्रदेशात गेल्याचे लक्षात आले.
--
(२)
मध्य प्रदेशात ऑपरेशन सुरू
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मध्य प्रदेशातील एडीजी योगेश चाैधरी यांच्याशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त निलोत्पल, उपायुक्त राजमाने आणि उपायुक्त साहू यांनी जबलपूर, कटनी जिल्ह्यातील आपापल्या बॅचमेटशी संपर्क करून आरोपी जबलपूर-कटनीच्या मध्ये असलेल्या छपारा येथील प्रेम लॉजमध्ये असल्याचे सांगत त्यांना पकडण्याबाबत सूचना केल्या. दुसरीकडे शहर पोलिसांची चार वाहनांतून २५ जणांची पाच पथके तिकडे रवाना करण्यात आली.
---
(३)
आरोपींचा अपघात, सिनेस्टाईल कारवाई
पोलीस पोहोचण्यापूर्वीच सोमवारी रात्री ११.४५ ला आरोपी तेथून सटकले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांना चुकविण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने ते वाहन चालवीत होते. त्यामुळे एका दुचाकीला अपघात होऊन आरोपी वीरेंद्रकुमार सुखदेव (वय २६, रा. गोथनी, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) आणि दीपक राजकुमार त्रीपाठी (२४, रा. गंगानगर, मऊ, अलाहाबाद) हे दोघे खाली पडले. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. एका आरोपीचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याच्यावर लगेच उपचार करण्यात आले, तर पोलीस पाठलाग करीत असल्यामुळे दोन आरोपींनी आपली दुचाकी रस्त्यावर सोडून जंगलात पळ काढला. यादव आणि त्रिपाठीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ किलो चांदी, १५ ग्रॅम सोने, रोख ३८ हजार, चार मोबाईल, एक पिस्तूल आणि ४ काडतूस तसेच दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या.
---
(४)
तपास पथकाला एक लाखाचा कॅश रिवॉर्ड
दरोड्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या तपास पथकाला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी एक लाख रुपयांचा कॅश रिवॉर्ड जाहीर केला. जरीपटक्याचे ठाणेदार नितीन फटांगरे, सहायक निरीक्षक धुमाळ, देवकाते, एएसआय वहाब, पोलीस कर्मचारी दीपक कारोकर, रोशन, गणेश गुप्ता, गजानन निशितकर, गिरडकर आणि महेंद्र तसेच गुन्हे शाखेच्या पथकाचा यात समावेश आहे.
----