एकाच नंबरचे दोन ट्रक, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:04+5:302021-02-20T04:20:04+5:30
टाकळघाट : बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात एकाच क्रमांकाचे दोन ट्रक फिरत असल्याच्या गुप्त सूचनेवरून बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून टाटा ...

एकाच नंबरचे दोन ट्रक, दोघांना अटक
टाकळघाट : बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात एकाच क्रमांकाचे दोन ट्रक फिरत असल्याच्या गुप्त सूचनेवरून बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून टाटा आयशर १९०९ - वाहन क्रमांक के.ए.- १३ ए.-४८०८ क्रमांकाच्या दोन ट्रकसह ४५३९० किलो लोखंडी स्क्रॅप (भंगार) अंदाजे किंमत ३९ लाख ८३ हजार ७०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली. जागीर अब्बास ददूसाहेब ऊर्फ दाऊद सय्यद (४१) आणि साजीद अब्दुल सत्तार शेख (४४), दोघेही रा. बंगळुरू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बुटीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्नेहल फार्मा कंपनीच्या मागील रोडवर एकाच नंबरचे दोन ट्रक असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत शहानिशा करण्याकरिता पोलिसांनी जाऊन बघितले असता स्नेहल फार्मा कंपनीच्या मागे के.ए.- १३ ए.- ४८०८ क्रमांकाचा एक ट्रक ज्यामध्ये लोखंडी स्क्रॅप (भंगार) भरलेला उभा होता. तर याच क्रमांकाचा दुसरा ट्रक गणेशपूर रोडवर ए.सी.सी. चौककडे जाताना दिसून आला. पोलिसांनी दोन्ही ट्रक जप्त करून आरोपींना अटक करून विचारपूस केली असता या गुन्ह्यातील आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता दोन्ही ट्रकला एकाच क्रमांकाचे म्हणजेच के.ए.- १३ ए.- ४८०८ क्रमांकाची बनावट नंबर प्लेट वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी भादंवि कलम ४२०,३४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. हे दोन्ही ट्रक कर्नाटक, बंगळुरू येथील सय्यद मेहबूब सय्यद सरदार यांच्या मालकीचे आहेत. या दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी ४.२ टन लोखंडी स्क्रॅप (भंगार) बुटीबोरी येथे आणण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार शैलेंद्र नागरे करीत आहेत.