अवैध रेतीवाहतुकीचे दोन ट्रक पकडले
By Admin | Updated: July 16, 2016 03:05 IST2016-07-16T03:05:43+5:302016-07-16T03:05:43+5:30
पोलिसांनी मानोरा फाटा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले.

अवैध रेतीवाहतुकीचे दोन ट्रक पकडले
ट्रकचालक पसार : ११ ब्रास रेती जप्त
भिवापूर : पोलिसांनी मानोरा फाटा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले. त्यात एकूण ८६ हजार रुपये किमतीची ११ ब्रास रेती जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मानोरा शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी या शिवाराची पाहणी केली. दरम्यान, मानोरा फाटा परिसरात पोलिसांना एमएच-४०/एके-६५५७ व एमएच-४०/एके-३९९५ क्रमांकाचे ट्रक आढळून आले. संशय आल्याने पोलिसांनी दोन्ही ट्रक थांबवून त्यांची कसून तपासणी केली. दोन्ही ट्रकमध्ये रेती असल्याचे निदर्शनास येताच वाहतूक रॉयल्टी तपासण्यात आली. त्यात दोन्ही ट्रक मधील रेती ही विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट होताच दोन्ही ट्रकसह त्यातील ११ ब्रास रेती जप्त केली. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी ट्रकमालक व चालक यांच्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस हवालदार संजय पायक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)