वीज कोसळून दोन भावंडं ठार, महिला गंभीर
By Admin | Updated: October 16, 2014 00:55 IST2014-10-16T00:55:25+5:302014-10-16T00:55:25+5:30
हिंगणघाट तालुक्यातील नरसाळा येथे बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने झाडाखाली उभे असलेले भावंड जागीच ठार झाले.

वीज कोसळून दोन भावंडं ठार, महिला गंभीर
नरसाळा शिवार आणि कळमगाव येथील घटना : बैलजोडीही ठार
हिंगणघाट, सेलू (वर्धा)/ चांदूररेल्वे/मंगरूळ चव्हाळा : (अमरावती) : हिंगणघाट तालुक्यातील नरसाळा येथे बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने झाडाखाली उभे असलेले भावंड जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास नरसाळा शिवारात घडली. अण्णा ज्ञानेश्वर रोकडे (३६), विनोद ज्ञानेश्वर रोकडे (३३) अशी मृतकांची नावे असून दुर्गा अण्णा रोकडे (२८) या गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारार्थ सेवाग्राम येथे हलविण्यात आले.
नरसाळा, काचनगाव शिवारात दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतात काम करीत असलेल्या रोकडे कुटुंबीयातील तीन सदस्यांनी बाभळीच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. मात्र झाडावर वीज पडल्याने दोन जण जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास वर्धा व सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे सेलू तालुक्यातील क्षीरसमुद्रपूर आणि बाभुळगाव परिसरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. मतदान प्रक्रिया प्रभावित झाली होती.
दुसऱ्या घटनेत चांदूर रेल्वे नजीकच्या कळमगाव येथे वीज कोसळून बैलजोडी ठार झाली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे वीज कोसळल्याने मशिदीची भिंत कोसळली. बुधवार दि. १५ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
कळमगाव येथील मारोतराव बागळे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेले २ बैल वीज पडून मृत्युमुखी पडले. बागळे यांनी नुकतीच ६० हजार रुपयांत बैलजोडी विकत घेतली होती.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मंगरूळ चव्हाळा येथील मशिदीच्या आवारातील कडुनिंबाचे झाड जळाले. मशिद परिसरात लोकवस्ती आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
यवतमाळ जिल्ह्यात पाऊस
जिल्ह्यातील राळेगाव, घाटंजी आणि यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागात दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काही काळ मतदान प्रभावित झाले होते.
बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी राळेगाव आणि घाटंजी तालुक्यात एक ते दीड तास पाऊस कोसळला. तर यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरातही जोरदार पाऊस झाला.
(शहर प्रतिनिधी)