नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यापूर्वी दिल्लीत दोन लोक मला भेटायला आले. त्यांची नावे आता माझ्याकडे नाहीत. त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात २८८ जागा आहेत. आम्ही तुम्हाला (महाविकास आघाडी) १६० जागा निवडून येण्याची हमी देतो. त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर आपण त्यांची भेट राहुल गांधी यांच्याशी घालून दिली; पण त्यावेळी राहुल गांधी व मी दोघांनीही हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळवू, असा निर्णय घेतला, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केला.
शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोळाबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रेझेंटेशन दिले आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले पाहिजे. आमचा आक्षेप निवडणूक आयोगावर आहे. मग भाजपचे लोक यावर उत्तर का देतात, हे समजत नाही. गृहमंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवे होते.
संसदेतील आमचे सर्व सहकारी सोमवारी सकाळी ११ वाजता निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धडक देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदेंच्या पुढील वाटचालीचा अंदाज येईल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून परतले. याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, मी शिंदेंना खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे, ते कधीच बोलत नाहीत. त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल, असे वक्तव्य पवारांनी केले.
भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही नाही
आम्ही विचारांसोबत जातो. भाजप सोबत कुणी जात असेल तर त्यांच्यासोबत आम्ही नाही. आमच्याकडे दुसऱ्या फळीत सर्वच व्यक्ती पक्षाला मजबूत करण्यासाठी सक्षम आहे. कुणीच कमजोर नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी पॉवर पॉइंटद्वारे प्रेझेंटेशन केले. जसे आपण सिनेमा पाहायला मागे बसतो, तेव्हा तो अधिक स्पष्ट दिसतो. त्याच पद्धतीने मी व उद्धव ठाकरे मागे जाऊन बसलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
७५ वर्षे अटीचे आरएसएस पालन करेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७५ वर्षांचे होत आहेत, याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, आरएसएस ही शिस्तबद्ध संघटना आहे. एकदा निर्णय झाला तर त्याची चर्चा होत नाही, अंमलबजावणी होत असते. ७५ वर्षे निवृत्ती वयाच्या बाबतीत शिस्तीचे पालन होईल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवारांवर राहुल भेटीचा परिणाम : फडणवीस
शरद पवार यांच्यावर राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतो आहे. कारण इतकी वर्षे राहुल गांधी जेव्हा ईव्हीएमवर आरोप करत होते, तेव्हा ते काहीच बोलत नव्हते. उलट ईव्हीएमला दोष देणे योग्य नाही, असेच ते म्हणायचे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राहुल गांधी सलीम-जावेद यांच्यासारख्या कहाण्या तयार करून त्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कथा सांगतात तशी अवस्था तर शरद पवारांची झाली नाही ना, अशी टीका फडणवीस यांनी केली.