आणखी दोन आरोपी गजाआड
By Admin | Updated: June 29, 2015 03:18 IST2015-06-29T03:18:42+5:302015-06-29T03:18:42+5:30
मोहित मार्टिन पीटर (वय २३) या बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टरच्या हत्याकांडातील आरोपींसोबत बिल्डरचे कनेक्शन उजेडात आल्याचे वृत्त लोकमतने ठळकपणे ...

आणखी दोन आरोपी गजाआड
मोहित पीटर हत्याकांड : सूत्रधाराचे पाठीराखे सक्रिय
नागपूर : मोहित मार्टिन पीटर (वय २३) या बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टरच्या हत्याकांडातील आरोपींसोबत बिल्डरचे कनेक्शन उजेडात आल्याचे वृत्त लोकमतने ठळकपणे प्रकाशित करताच सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे बिल्डरच्या पाठीराख्यांनी त्याच्या बचावासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी सागर ऊर्फ फ्रँक अॅन्थोनी (वय २०) आणि दीपक ऊर्फ अँगल फ्रान्सिस अलेक्झांडर (वय २४) या दोन गुंडांना अटक केली आहे.
शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास उपरोक्त आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी मोहितच्या डोळ्यात तिखट फेकून त्याची निर्घृण हत्या केली होती. कोयता, तलवारीचे घाव करून मारेकऱ्यांनी मोहितला जागीच संपवले. तर मिखिल मायकल फ्रान्सिस (वय १८) याच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी त्याला मागे ओढून जबर जखमी केले. आरोपींनी पळून जाताना या दोघांच्या गळ्यातील दोन लाखांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. या प्रकरणी गुन्हे शाखा आणि गिट्टीखदान पोलिसांनी धावपळ करून काही तासातच मॅडी ऊर्फ आशिष राठोड, तंबी ऊर्फ जेम्स बबलू गॅब्रियल, ब्रायन बेस्ट्रीयन ऊर्फ इब्राहिम अण्णा पलटी ऊर्फ सचिन गॅब्रियल आणि पापा ऊर्फ राजेंद्र जयराम साळवे या पाच आरोपींना अटक केली.
तर, रविवारी दुपारी सागर ऊर्फ फ्रँक तसेच दीपक ऊर्फ अँगल या अजनीतील दोन गुंडांना अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या सात झाली आहे. आरोपींकडून एक स्कूटर तसेच तलवार आणि कोयताही जप्त करण्यात आला होता. ही स्कूटर आरोपी सागरची आहे. तसेच मोहितवर अन्य आरोपींसोबतच या दोघांनीही घाव घातल्याची कबुली दिली आहे.(प्रतिनिधी)
आरोपीने पिटला डांगोरा
दरम्यान, पहिल्या दिवशी अटक केलेल्या पाचपैकी एका आरोपीने प्राथमिक तपासातच वादग्रस्त बिल्डरच्या नावाचा ‘डांगोरा’ पिटला. त्यानंतर कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्येही उपरोक्त गुन्हेगारांच्या ‘महाराज’ संपर्कात असल्याचे उघड झाले. लोकमतने शनिवारी ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलिसांच्या तपासाची सुई बिल्डरच्या दिशेनेही वळली आहे. बिल्डरनेच मॅडीमार्फत सुपारी देऊन मोहितचा गेम केल्याची चर्चा आहे. बिल्डर आधीपासूनच आरोपींच्या संपर्कात होता. मात्र, सुपारी दिल्याचे उघड होणार नाही, अशी खात्री आरोपींना होती.
बिल्डरची फिल्डिंग
तंबी आणि ब्रायनमधील वादातून मोहितची हत्या झाल्याचे चित्र निर्माण करू, फार तर मॅडीला अटक होईल, आपले नाव पुढे येणार नाही. सुपारी किलिंगचाही उलगडा होणार नाही, अशी खात्री आरोपींना होती. मात्र आता पोलिसांची आपल्याकडे नजर वळल्याचे लक्षात येताच वादग्रस्त बिल्डरनेही बचावासाठी धावपळ सुरू केली आहे. पोलिसांचे हात आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी बिल्डरने आपल्या पाठीराख्यांमार्फत जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांनी काहींशी संपर्क करून पोलिसांनी बिल्डरला ‘मामा’ बनवू नये, यासाठीही बोलणी केली आहे. एका वादग्रस्त पोलिसाने बिल्डरला ‘मामा’ बनवणार नाही, असे आश्वासन दिल्यामुळे बिल्डरचे पाठीराखे आश्वस्त आहेत. दुसरीकडे बिल्डरच्या विरुद्ध पोलीस कधी कारवाई करतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.