दोन मित्रांना लुटले, सीसीटीव्हीमुळे काही तासात गवसले
By योगेश पांडे | Updated: May 12, 2024 15:41 IST2024-05-12T15:40:47+5:302024-05-12T15:41:17+5:30
रणजीत दौलतराव मोडकर (४९, वडधामना) व त्यांचा मित्र सुभाष वाघमारे हे शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर फिरत होते

दोन मित्रांना लुटले, सीसीटीव्हीमुळे काही तासात गवसले
नागपूर : शतपावलीसाठी निघालेल्या दोन मित्रांना मारहाण करत त्यांना लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या काही तासांत अटक केली. वाडी पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
रणजीत दौलतराव मोडकर (४९, वडधामना) व त्यांचा मित्र सुभाष वाघमारे हे शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर फिरत होते. आठवा मैल येथील देशी दारूच्या दुकानाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबविले व वाघमारे यांच्या खिशातून दीड हजार रुपये हिसकावले. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने रणजीतच्या खिशात हात टाकला. मात्र पैसे नसल्याने त्यांनी शिवीगाळ करत दोघांनाही बेदम मारहाण केली व पळून गेले. रणजीत यांच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला व शुभम कैलास ससाने (२८, आंबेडकरनगर, वाडी) तसेच विक्रम उर्फ सलमान दिनकर वाघमारे (३८, एलआयसी क्वॉर्टर्स, दवलामेटी, म्हाडा कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात आली.