जिल्हाभरात उद्या चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:43+5:302021-02-05T04:45:43+5:30
नागपूर : ‘पोलिओमुक्त भारत’ अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ७१ हजार ५५५ बालकांना ...

जिल्हाभरात उद्या चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’
नागपूर : ‘पोलिओमुक्त भारत’ अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ७१ हजार ५५५ बालकांना ३१ जानेवारी रोजी पोलिओ डोस दिला जाणार आहे. यात शहरातील सुमारे २ लाख ७६ हजार ४७३ तर ग्रामीण भागातील १ लाख ९५ हजार ८२ बालकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी शहरात १५२९, ग्रामीणमध्ये २३४३ असे एकूण ३८७२ बुथ असणार आहेत. लसीकरणाची जबाबदारी ८४८७ कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
पोलिओ अथवा पोलियोमायलिटिस हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओच्या उपसर्गाच्या ९० टक्के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत; परंतु विषाणूनेे रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलिओ रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १ टक्केपेक्षा कमी रुग्णांच्या बाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते. भारतात १९९५ पासून पल्स पोलिओ योजनेला सुरुवात झाली. २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारताला पोलियोमुक्त जाहीर केले.
१)शहरात २ लाखांवर बालकांना डोस देण्याचे लक्ष्य
मागील वर्षी शहरात २ लाख ७६ हजार ४७३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले होते. यावर्षीही २ लाखांवर बालकांना डोस देण्याचे लक्ष्य आहे. लसीकरणासाठी १५२९ बुथ तयार करण्यात आले आहेत. याची ३०५८ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. रविवारी लसीकरणातून सुटलेल्या बालकांना २ ते ६ फेब्रुवारीच्या दरम्यान ७ लाख ४२ हजार ६७९ घरांना भेटी दिल्या जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.
२) ग्रामीणमध्ये १ लाख ९५ हजार बालकांचे लक्ष्य
पल्स पोलिओ लसीकरणासाठी नागपूर ग्रामीणमध्ये १ लाख ९५ हजार ८२ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे लक्ष्य आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर यांच्या मार्गदर्शनात २३४३ लसीकरण बुथ तयार करण्यात आले. याची जबाबदारी ५४२९ कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
-पोलिओ जनजागृती रथ
पोलिओ डोस अभियानाचा ‘जनजागृती रथा’ला आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी हिरवी झेंडी दाखविली.यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. वैशाली मोहकर उपस्थित होते.
कोट...
-सुटलेल्या बालकांना घरोघरी जावून लस पाजणार
३१ जानेवारी रोजी होणाऱ्या लसीकरण मोहिमेतून ग्रामीण भागात सुटलेल्या बालकांना २ फेब्रुवारीपासून ३ दिवस व शहरी भागात सलग ५ दिवस घरोघरी जावून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात २०९ ट्रांझिट टिमद्वारे बसस्टँड, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी व १३० मोबाइल टिमद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
-डॉ. दीपक सेलोकर
जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर.
-० ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थी : ४७१५५५
-एकूण बूथ : ३८७२
-एकूण कर्मचारी : ८४८७
-पर्यवेक्षक (शहर) : २६२
-अशी चालेल मोहीम (शहर)
-मोबाइल पथक : १८
-ट्रांझिट पथक : ८८
-लसीकरणाची वेळ सकाळी ८ ते सायं. ५