नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, बहुतांश तालुक्यात १० टक्केही उमेदवारांनी अर्ज दाखल केले नसल्याचे दिसून येत आहे. भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुका एकसंघ होऊन लढण्याचा संकल्प केल्याने गावागावात पॅनेल निश्चित करताना गुंता वाढला आहे. इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले नसल्याने भाजपनेही आपले पॅनेल अद्याप जाहीर केले नाही. त्यामुळे एकाच वेळी गावागावात उमेदवारांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे २९ आणि ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी तालुकास्तरावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
काटोल तालुक्यात १९ अर्ज
काटोल : काटोल तालुक्यात होऊ घातलेल्या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी १९ उमेदवारांनी अर्ज सादर केले. तालुक्यात खंडाळा (खु.),भोरगड आणि माळेगाव येथे निवडणूक होत आहे. आतापर्यंत खंडाळा (खु.) ग्रा.पं.करिता ५ , भोरगड (७) व माळेगाव ग्रा.पं.साठी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तालुक्यात तीनच ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने सर्वच राजकीय नेते मंडळी येथे लक्ष केंद्रित केले आहे. मात्र अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असला तरी तहसील कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज सादर करताना मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. ऑनलाईन अर्ज सादर करताना मात्र अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.