नरखेड : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नरखेड तालुक्यात आतापर्यंत विविध ग्रा.पं.साठी १८ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. नरखेड तालुक्यात १७ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक होऊ घातलेल्या गावात अद्याप विविध राजकीय गटांकडून पॅनेल निश्चित झाले नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल होण्यास विलंब होताना दिसत आहे. आतापर्यंत १७ ग्रामपंचायतीपैकी येरला (इंदोरा) १, पेठइस्माईलपूर १, खैरगाव ७, मदना २ आणि जलालखेडा ग्रा.पं.साठी ७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तहसील कार्यालयात निर्माण करण्यात आलेले आर.ओ. कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत केवळ १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. इकडे तालुकास्तरावर राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जलालखेडा, खैरगाव या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी दिसून येत आहे. तालुक्यात लहान ग्रामपंचायतीसुद्धा त्याच मार्गावर असल्याचे राष्ट्रवादीचे अनिल साठोणे यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. कुठेही कोरोनाचे नियम पाळण्यात येत नाही. गावपातळीवर तसेच तहसील कार्यालयात उमेदवारासोबत अनुमोदक, सुचक आणि कार्यकर्ते बिना मास्क व फिजिकल डिस्टन्स न पाळता वावरत होते.
इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने अनेक इच्छूक उमेदवारही ग्रामपंचायत निवडणुकीत उत्साह दाखवित आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढतीवर आहे. आपणच सरपंच होणार या विश्वासाने इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराला जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा सादर केल्याची पोच पावती, बँकेचे पासबुक, खर्च करण्याचे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत देणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूकीत भाग्य आजमावणारे उमेदवार जात पडताळणीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी अर्जणवीस यांच्याकडे गर्दी करीत आहे.