हृदयरोगावर आजपासून दोन दिवस जागतिक परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST2021-03-13T04:15:13+5:302021-03-13T04:15:13+5:30
नागपूर : अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकाराने १३ व १४ मार्च रोजी ‘नागपूर लाईव्ह-२०२१’ या आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजी परिषदेचे ...

हृदयरोगावर आजपासून दोन दिवस जागतिक परिषद
नागपूर : अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकाराने १३ व १४ मार्च रोजी ‘नागपूर लाईव्ह-२०२१’ या आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही परिषद ऑनलाईन होणार आहे. या परिषदेत विविध देशातील ४० हृदयरोग विशेषज्ञ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, यात अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जसपाल अर्नेजा हे लाईव्ह शस्त्रक्रियेतून मार्गदर्शन करतील.
या परिषदेत जगप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. अँटोनियो कोलंबो (इटली), डॉ. समीन शर्मा (अमेरिका) डॉ. क्रिस्टोफर नाबेर ( जर्मनी) डॉ. ए.बी. मेहता (जसलोक हॉस्पिटल, मुंबई) डॉ. सॅम्युअल मॅथ्यूज (चेन्नई) डॉ. ग्युलिओ ग्वॉग्लीव्हमी (इटली), डॉ. अक्कीको फुझीनो (जपान), डॉ. झियाद अली (अमेरिका), डॉ. ज्युनिआ शाईत (जपान) आणि डॉ. एम्मानौली ब्रिलाकीस (अमेरिका) यासारखे वरिष्ठ हृदयरोग विशेषज्ञ सहभागी होणार आहेत. जगभरातून सुमारे पाच हजार कार्डिओलॉजिस्ट आणि तज्ज्ञ परिषदेत उपस्थित राहतील. ‘गुंतागुंतकडून साधेपणाकडे’ ही या परिषदेची संकल्पना आहे. जटील प्रक्रियेतून सोप्या पद्धतीने उपचार, हे या परिषदेचे वैशिष्ट्य राहणार आहे. शिवाय नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘लाईव्ह’ शस्त्रक्रियेतून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा आणि त्यांची चमू व माऊंट सीनाय हॉस्पिटल, न्यू यॉर्कचे डॉ. समीन शर्मा मिळून लाईव्ह शस्त्रक्रिया करणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण जगभरातील १०० पेक्षा जास्त रुग्णालयात होईल. ५०० पेक्षा जास्त कार्डिओलॉजिस्ट याचे साक्षीदार राहतील. हृदयरोग परिषदेची ही दुसरी ऑनलाईन आवृत्ती आहे. डॉ. विवेक मंडुरके व डॉ. अमर आमले या परिषदेच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.