मुलाचे डोके फोडणाऱ्या दोघांना कारावास
By Admin | Updated: March 4, 2017 02:07 IST2017-03-04T02:07:42+5:302017-03-04T02:07:42+5:30
एका शाळकरी मुलाचे डोके फोडणाऱ्या दोन जणांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. ए. तिवारी यांच्या न्यायालयाने

मुलाचे डोके फोडणाऱ्या दोघांना कारावास
नागपूर : एका शाळकरी मुलाचे डोके फोडणाऱ्या दोन जणांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. ए. तिवारी यांच्या न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नारायण हाताम कालखोर (३८) आणि ईशू हाताम कालखोर, अशी आरोपींची नावे असून ते गोरले ले-आऊट येथील रहिवासी आहेत. आशुतोष मोहन कोडे (१७), असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो जयताळा भागातील रमाबाई आंबेडकरनगर येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे की, आशुतोष कोडे हा २७ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरले ले-आऊट येथील स्वप्निल केदार याच्या घरी गेला होता. त्याचवेळी स्वप्निलच्या शेजारी राहणाऱ्या ईशू कालखोर याने आशुतोष याला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आपल्या सोबत नेले होते. परत आल्यानंतर आशुतोष हा ईशूसोबतच त्याच्या घराच्या आत गेला होता. त्याचवेळी नारायण कालखोर आणि ईशू यांनी त्याला तू घरात का आला , अशी विचारणा करून आणि वाद घालून टी टेबलवरील काच त्याच्या डोक्यावर मारून त्याला रक्तबंबाळ केले होते. आशुतोषच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध भादंविच्या ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ७ डिसेंबर २०१४ रोजी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक एम. जी. शिंदे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील गायत्री वर्मा यांनी तर आरोपींच्या वतीने अॅड. अब्दुल जमील यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल संजय काळमेघ आणि नायक पोलीस शिपाई गजानन उईके यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)