एका महिन्यात दोन बिल!
By Admin | Updated: July 11, 2015 02:59 IST2015-07-11T02:59:09+5:302015-07-11T02:59:09+5:30
स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमीटेड (एसएनडीएल) या वीज वितरण फ्रेन्चायजीने ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या नावाखाली ...

एका महिन्यात दोन बिल!
एसएनडीएलचा एसएमएस : ग्राहक संभ्रमात
नागपूर : स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमीटेड (एसएनडीएल) या वीज वितरण फ्रेन्चायजीने ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या नावाखाली ‘एसएमएस’ च्या माध्यमातून वीज बिलाची माहिती देण्याची योजना सुरू केली आहे. यात कंपनीतर्फे प्रत्येक महिन्याला वीज ग्राहकांना ‘एसएमएस’ पाठवून त्यांच्या वीज बिलाची माहिती दिली जाते. मात्र या महिन्यात एसएनडीएलचा तो ‘एसएमएस’ग्राहकांसाठी डोकेदुखी बनला आहे.
एसएनडीएल कंपनीने या महिन्यात अनेक वीज ग्राहकांना जुलै महिन्याचे बिल पाठवून ते २७ जुलैपर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे वीज ग्राहक संभ्रमित झाले असून, एकाच महिन्यात दोन बिले कशी? असा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
अशाच प्रकारे ग्राहक क्रमांक ४१००११५७९२२५ असलेल्या वीज ग्राहकाला एकाच महिन्यात दोन बिले देण्यात आली आहे. त्यांना सुरुवातीला जून महिन्यासाठी ८७० रुपयांचे बिल पाठविण्यात आले असून ते २१ जुलैपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र या मुदतीपूर्वीच एसएनडीएलतर्फे पुन्हा दुसरा ‘एसएमएस’ प्राप्त झाला असून, त्यात ८८१.७५ रुपयांचे बिल २१ जुलैपर्यंत भरण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे या महिन्यात एसएनडीएलकडून अनेक वीज ग्राहकांना चुकीचा ‘एसएमएस’ गेला आहे. यासंबंधी कंपनीने सुद्धा चूक झाली असल्याचे मान्य केले आहे. (प्रतिनिधी)