दोन आरोपींची निर्दोष सुटका
By Admin | Updated: March 2, 2017 02:30 IST2017-03-02T02:30:01+5:302017-03-02T02:30:01+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील हत्याप्रकरणातील दोन आरोपींची निर्दोष सुटका केली.

दोन आरोपींची निर्दोष सुटका
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील हत्याप्रकरणातील दोन आरोपींची निर्दोष सुटका केली.
अशोक विठ्ठल चहांदे (५४) व जितेंद्र ऊर्फ बाळू उत्तम नगराळे (३४) अशी आरोपींची नावे आहेत. कल्पना नगराळेची हत्या व रत्नकला चहांदेच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. कल्पना ही जितेंद्रची पत्नी व अशोकची मुलगी होती तर, रत्नकला ही अशोकची पत्नी व जितेंद्रची सासू होय. २३ मार्च २०१३ रोजी आरोपींनी दोघींना अंगावर रॉकेल ओतून जाळले, असे पोलिसांचे म्हणणे होते. २७ मार्च रोजी कल्पनाचा मृत्यू झाला तर रत्नकला बचावली. सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व १० हजार रुपये दंड तर, कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत पाच वर्षे सश्रम करावास व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, आरोपींचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. आरोपींतर्फे अॅड. राजेंद्र डागा व अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)