खासदार तुमाने यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुर्किश आर्मीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:57 IST2021-09-27T19:55:59+5:302021-09-27T19:57:48+5:30
Nagpur News रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे दोन सोशल मीडिया अकाऊंट सोमवारी सकाळी तुर्किश आर्मी नामक हॅकर ग्रुपने हॅक केले.

खासदार तुमाने यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुर्किश आर्मीचा हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे दोन सोशल मीडिया अकाऊंट सोमवारी सकाळी तुर्किश आर्मी नामक हॅकर ग्रुपने हॅक केले. सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर खा. तुमाने यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
संयुक्त राष्ट्रसभेत भारताची बाजू मांडून पाकिस्तानला इशारा देणाऱ्या स्नेहा दुबे यांची फेसबुक पोस्ट रविवारी जागतिक कन्यादिनी खा. तुमाने यांनी पोस्ट केली. ती व्हायरल होत असतानाच सोमवारी पहाटे ५.३४ वाजता तुर्किश हॅकरने त्यांचे अकाऊंट हॅक केले. फेसबुकसोबतच ट्विटर अकाऊंट याच हॅकरने हॅक केले आहे. फेसबुकवरचा संदेश बदलवून ट्विटरचा डीपी बदलविला आहे. विशेष म्हणजे, हॅकरने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर हॅकिंग केल्याचे नमूद केले आहे. ‘माय नेम ईज फेलोनी हॅकर, ॲब हॅकर’ असे नमूद करतानाच त्याने लाल रंगात ‘कॅस्ट्रो’ असेही नमूद केले आहे. सोमवारी सकाळी हे दिसून आल्यानंतर खा. तुमाने यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.
विशेष म्हणजे, सायबर गुन्हेगारांनी आतापावेतो नागपुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील, पत्रकारांसह पोलीस आयुक्तांचेही फेसबुक अकाऊंट हॅक केले आहे. आता देशाच्या संसदेत बसणाऱ्या खासदारांचे अकाऊंट हॅक करण्याची मजल मारून सायबर गुन्हेगारांनी त्यांचा निर्ढावलेपणा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. हॅकरकडून वारंवार होणाऱ्या सोशल मीडियावरील हल्ल्यामुळे सायबर पोलिसांची पॉलिसीही कमकुवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
खा. तुमाने म्हणतात...
स्नेहा दुबेची पोस्ट टाकल्यावर भारतविरोधी कटकारस्थाने करणाऱ्या संस्था संघटनांपैकी एक असलेल्या पाकिस्तानातील तुर्किश सिक्युरिटी आर्मीने अकाऊंट हॅक करणे म्हणजे पाकिस्तान भारतीय मुलींना घाबरतो, हे यातून स्पष्ट झाल्याचे खा. तुमाने यांनी या संबंधाने म्हटले आहे.
---