‘तुरागोंदी’ होणार वर्षभरात पूर्ण

By Admin | Updated: June 30, 2015 03:17 IST2015-06-30T03:17:41+5:302015-06-30T03:17:41+5:30

जनमंचच्या पुढाकाराने आणि विविध संघटनांच्या सहकार्याने सुरू असलेल्या सिंचन शोधयात्रेचा परिणाम दिसू लागला

'Turaagondi' will be completed in the year | ‘तुरागोंदी’ होणार वर्षभरात पूर्ण

‘तुरागोंदी’ होणार वर्षभरात पूर्ण

सिंचन शोधयात्रेचे पहिले यश : जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
नागपूर : जनमंचच्या पुढाकाराने आणि विविध संघटनांच्या सहकार्याने सुरू असलेल्या सिंचन शोधयात्रेचा परिणाम दिसू लागला आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सिंचन भवनात एक बैठक पार पडली असून अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘तुरागोंदी’ प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम वर्षभरात म्हणजे जून २०१६ पर्यंत पूर्ण करून त्यात पाणी अडविण्यात येईल. तसेच सर्व काही व्यवस्थित राहीले तर २०१७ अखेरपर्यंत प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात होईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची अवस्था आहे तशीच आहे. जेव्हापर्यंत सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होणार नाही. शेताला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत शेती फायद्याची होणार नाही आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. नेमकी ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जनमंच, लोकनायक बापुजी अणे स्मारक समिती, विदर्भ इकोनॉमिकल डेव्हलपमेंट कौन्सिल, स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान मंच यांच्या पुढाकारातून विदर्भ सिंचन शोधयात्रा अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत चार प्रकल्पांची पाहणी करण्यात आली आहे.
या शोधयात्रेची सुरुवातच हिंगणा तालुक्यातील तुरागोंदी या लघु प्रकल्पापासून करण्यात आली होती. तेव्हा तेथे विदारक स्थिती आढळून आली. १६ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम केवळ ३० टक्के पूर्ण झाले आहे. यानंतर नरखेड तालुक्यातील पिंपळगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाला भेट देऊन तेथील वस्तुस्थितीचाही आढावा घेण्यात आला.
तेव्हा तेथील आ. आशिष देशमुख हे स्वत: शोधयात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आ. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन सेवा भवन येथील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
परंतु काही कारणास्तव आ. देशमुख बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. या बैठकीत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक आर.के. ढवळे, पाटबंधारे प्रकल्प विभाग नागपूरचे कार्यकारी अभियंता एस.डी. वानखडे, लघु पाटबंधारे उपविभाग खापाचे उपविभागीय अभियंता एन.जी. ओक, मध्य रेल्वेचे सहायक अभियंता श्रीवास्तव, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, राजीव जगताप, लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीचे संयोजक अ‍ॅड. अविनाश काळे, स्वदेशी जागरण मंचचे प्रा. अजय पत्की, भारतीय किसान संघचे अजय बोंदरे आणि नाना आखरे यांच्यासह राहुल उपगन्लावार, प्रदीप माहेश्वरी, शाखा अभियंता ए.डी. वाकुळकर, आर.ए. टिल्लू प्रमुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात अधीक्षक अभियंता व प्रशासक आर.के. ढवळे यांनी तुरागोंदीची माहिती देताना या प्रकल्पातील मुख्य धरण जून २०१६ पर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा केला.
तसेच प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता, वितरण प्रणालीचा सुधारित आराखडा, कामासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता, पाईपद्वारे सुधारित वितरण प्रणाली पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता या सर्व मंजुरी व शेतकऱ्यांची सहमती या बाबी वेळेवर पूर्ण झाल्यास तुरागोंदी प्रकल्पाची पाणी २०१७ अखेरपर्यंत सिंचनासाठी उपलब्ध होण्यास अडचण नाही, असे कार्यकारी अभियंता संजय वानखडे यांनी स्पष्ट केले.
यावर शासन स्तरावर व शेतकऱ्यांची सहमती मिळविण्याबाबत संघटना विभागासोबत काम करण्यास तयार असल्याचे आश्वासन संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले. देवेंद्र पारेख यांनी भूमिका विशद केली. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी आढावा बैठक
विदर्भातील सिंचन प्रकल्पांसंबंधित रखडलेल्या प्रकल्पांच्या कामाबाबात आणि बैठकीत चर्चिल्या गेलेल्या मुद्याच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी सिंचन भवनातील मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी १०.३० वाजता आढावा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

Web Title: 'Turaagondi' will be completed in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.