तुली पिता-पुत्राकडून वन कायद्याचा भंग
By Admin | Updated: June 3, 2015 02:40 IST2015-06-03T02:40:05+5:302015-06-03T02:40:05+5:30
वन कायद्याचा भंग केल्यावरून प्रसिद्ध व्यवसायी मोहब्बतसिंग तुली आणि त्यांचे चिरंजीव सत्यवीत विक्रमसिंग तुली यांच्याविरुद्ध वन विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.

तुली पिता-पुत्राकडून वन कायद्याचा भंग
न्यायालय : पुत्रास तात्पुरता अटकपूर्व जामीन
नागपूर : वन कायद्याचा भंग केल्यावरून प्रसिद्ध व्यवसायी मोहब्बतसिंग तुली आणि त्यांचे चिरंजीव सत्यवीत विक्रमसिंग तुली यांच्याविरुद्ध वन विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने सत्यवीत विक्रमसिंगला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, पुढची सुनावणी ४ जून रोजी आहे.
देवलापार क्षेत्रातील मानसिंग अभयारण्याला लागून बांद्रा या गावात तुली वीर बाघ रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टचे प्रबंध संचालक मोहब्बतसिंग तुली आणि संचालक सत्यवीत विक्रमसिंग हे आहेत. या रिसॉर्टच्या मागे वन विभागाच्या जागेवर मद्याच्या रिकाम्या बाटल्या, जळालेले प्लास्टिक आदी आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या होत्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून १२ जानेवारी २०१५ रोजी तुली पिता-पुत्राविरुद्ध भारतीय वन कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. अटकेच्या भीतीने सत्यवीत विक्रमसिंग याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासा दिला. मोहब्बतसिंग तुली हे परदेशात गेले आहेत. न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. शुक्ला तर सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)