भाजी विक्रेत्याला गोळी घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:20+5:302021-05-25T04:09:20+5:30
सुदैवाने वाचला जीव : पाचपावलीत थरार, कुख्यात गुंड गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन कुख्यात गुंडांनी एका भाजी ...

भाजी विक्रेत्याला गोळी घालण्याचा प्रयत्न
सुदैवाने वाचला जीव : पाचपावलीत थरार, कुख्यात गुंड गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन कुख्यात गुंडांनी एका भाजी विक्रेत्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळी बाहेर पडली नाही. त्यामुळे भाजी विक्रेत्याचा जीव वाचला. रविवारी मध्यरात्री पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
दीपक गौर (वय ३८) आणि संजय नाईक (वय ३९) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कुख्यात गुंड असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाचपावलीतील महेंद्र नगरात सुबोध शशिकांत वासनिक (वय ३४) हा भाजीविक्रेता राहतो. त्याचा लहान भाऊ आरोपी गौर आणि नाईक सोबत राहत असल्याचे सुबोधला माहीत पडले. त्यामुळे त्याने आपल्या लहान भावाला समज दिली. ‘गौर आणि नाईक दोघेही गुंड असून त्यांच्यासोबत तू राहिला तर विनाकारण तुझ्यावर पोलीस कारवाई करतील. त्यामुळे तू त्यांच्या सोबत राहू नको’, असे सुबोधने आपल्या लहान भावाला समजावून सांगितले. आरोपी गौर आणि नाईकला ते माहीत पडले. त्यामुळे ते चिडले. रविवारी मध्यरात्री त्यांनी सुबोधला गाठले. त्याला मारहाण करून गौर याने सुबोधच्या छातीवर देशी पिस्तूल ठेवली आणि ट्रिगर दाबला. पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळी चालली नाही. त्यानंतर नाईकने लाकडी दांड्याने सुबोधला मारहाण केली. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून संतप्त झालेली त्या भागातील मंडळी धावली. त्यांनी दोन्ही गुंडांना पकडून त्यांची धुलाई केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. काहींनी पोलिसांना कळविले. माहिती कळताच पाचपावलीचा पोलिस ताफा तेथे पोहोचला. त्यांनी आरोपींना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.