नागपूरला सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: January 28, 2015 01:02 IST2015-01-28T01:02:36+5:302015-01-28T01:02:36+5:30
नागपूर शहराचा विकास सर्वोत्तम शहर म्हणून करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले.

नागपूरला सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न
पालकमंत्री: प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम
नागपूर: नागपूर शहराचा विकास सर्वोत्तम शहर म्हणून करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले.
सोमवारी कस्तूरचंद पार्कवर झालेल्या प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर त्यांना विविध महाविद्यालयाच्या पथकांनी परिविक्षाधीन पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली सलामी दिली. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार,पोलीस आयुक्त के.के.पाठक, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा उपस्थित होते.
नागपूरला देशात विकासाच्या क्षेत्रात क्रमांक एकचे शहर बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मिहान प्रकल्पाला चालना देण्याचे सर्वोत्परी प्रयत्न असून ‘मेक इन महाराष्ट्र’ची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे बुटीबोरीमध्ये सीएट टायर्स कंपनीच्या प्रकल्पाला परवानगी देऊन यापूर्वीच केली. केंद्र शासनाने नागपूरसाठी ‘आयआयएम’आणि ‘एम्स’ला मंजुरी दिली आहे. ‘नॅशनल लॉ स्कूल’साठी काळडोंगरी येथे ७० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे, असे बावनकुळे म्हणाले.कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधीक्षक शशिकांत माने, निताराम कुमरे, बळीराम जिवतोडे, दामोदार प्रसाद सिंह, के. दुबे, सच्चीदानंद रॉय, केशव मोरे, स्वप्निल नरवाडे आदी अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मंदा वैरागडे, गीता श्रीवास, वीणा खानोरकर, विशाखा पोटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार तर नागराज खुरसने, राधा देशमुख,संदीप खोब्रागडे, विजय डांगरे यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार जोगेंद्र कवाडे, डॉ. मिलिंद माने,आशिष देशमुख, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अनुक्रमे एस.क्यु. जमा, व्हिक्टर फ्रेटस, यादवराव देवगडे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. (प्रतिनिधी)