तंत्रज्ञानाद्वारे अवैध उत्खननावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: March 3, 2017 02:57 IST2017-03-03T02:57:39+5:302017-03-03T02:57:39+5:30
खाणींच्या आसपास अवैध उत्खनन होत असल्याची बाब नाकारता येणारी नाही. पूर्वी यावर देखरेख करणे शक्य होत नव्हते.

तंत्रज्ञानाद्वारे अवैध उत्खननावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न
खनिकर्म विभागाचे महानियंत्रक रंजन सहाय यांची ग्वाही
नागपूर : खाणींच्या आसपास अवैध उत्खनन होत असल्याची बाब नाकारता येणारी नाही. पूर्वी यावर देखरेख करणे शक्य होत नव्हते. मात्र आता रिमोट सेन्सिंग, सॅटेलाईट आणि ड्रोनसारख्या विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवैध उत्खननाची माहिती घेणे सोपे झाले आहे. अॅन्ड्राईड मोबाईलचे अॅप तंत्रज्ञानही यासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाचा वापर करून अवैध उत्खननावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची ग्वाही भारतीय खनिकर्म विभाग (आयबीएम)चे महानियंत्रक रंजन सहाय यांनी दिली.
टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्यावतीने आयोजित मिट दि प्रेस कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील बॉक्साईट, मॅगनीज, लोह, सोने या बिगर इंधन खाणी आयबीएमच्या अखत्यारित येतात. अशा २१०० खाणींवर आयबीएम नियंत्रण ठेवत आहे. आयबीएमने डिजिटल टेक्नॉलॉजीची मदत घेत सॅटेलाईट आधारीत मायनिंग सर्व्हिलन्स सिस्टीमच्या मदतीने पाहणी केल्यानंतर २९६ खाणींच्या लीज क्षेत्राच्या आसपास अवैध कारवाई होत असल्याचे आढळून आले. त्यापैकी ३२ खाणींजवळ अवैध उत्खनन होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला गेला. मात्र राज्य सरकारांकडून हवे ते सहकार्य मिळत नसल्याचे रंजन सहाय यांनी यावेळी स्पष्ट केले. सॅटेलाईट सिस्टीमसह आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अवैध उत्खननावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रोनच्या मदतीने खाणींना स्टार रेटींग देण्याची योजना आयबीएमने सुरू केली आहे. ही योजना उपयुक्त ठरत असून आॅस्ट्रेलियासारखे जगातील देश या योजनेचा स्वीकार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आर्थिक, पर्यावरण व सामाजिक गोष्टींची सांगड घातल्यास नागरिकही विकासाला विरोध करीत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी आयबीएमचे विभागीय नियंत्रक पीयूष शर्मा, मॉईलचे संचालक शुभांकर शोम, पत्रकार भवन ट्रस्टचे प्रदीप मैत्र, ब्रह्माशंकर त्रिपाठी उपस्थित होते.