हवालदाराला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 13, 2015 03:06 IST2015-12-13T03:06:56+5:302015-12-13T03:06:56+5:30
अंबाझरी पोलीस ठाण्यातील मालखान्यातून रोख रकमेसह ३७ लाख रुपयाचा माल लंपास केल्याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हवालदाराला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्यातील मालखान्यातून रोख रकमेसह ३७ लाख रुपयाचा माल लंपास केल्याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच आरोपी दिलीप चोरपगार खरी माहिती दडवत आहे.
अंबाझरी पोलिसांनी ८ डिसेंबरला रात्री त्याला अटक केली. दिलीप अंबाझरी ठाण्यात तैनात होता. त्याच्याकडे मालखान्याचा प्रभार होता. त्या दरम्यान त्याने ११ लाख २ हजार ३०० रुपये आणि दीड किलो सोने गायब केले. तीन वर्षांपूर्वी त्याची मुख्यालयात बदली झाली. त्यानंतरही त्याने आपला कार्यभार सोपविला नव्हता. या घटनेकडे अधिकाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. दिलीपने मालखान्यातील माल लंपास केल्याबाबत अनेक दिवसांपासून ठाण्यात चर्चा होती. त्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. चार महिन्यापूर्वी दिलीपला अंबाझरी ठाण्याशी जोडण्यात आले होते. तीन चार दिवसांपूर्वी तो गायब झाला. त्याने ड्युटीवर येणेही बंद केले. तो घरूनही गायब होता. फोनवरही तो प्रतिसाद देत नव्हता. ८ डिसेंबर रोजी रात्री तो पोलिसांच्या हाती लागला. तेव्हा अपहाराचे प्रकरण उघडकीस आले.
सूत्रानुसार दिलीपला मटक्याचा शौक आहे. त्याने दागिने विकले असून काही गहाणही ठेवले आहेत. त्यामुळे त्याला इतर लोकांनीही मदत केल्याचे लक्षात येते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास दिलीपला मदत करणाऱ्या आणि त्याला वाचवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)
त्यामुळेच अंबाझरी पोलीस हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. दिलीपला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.