Try to extort 10 lakhs from the doctor: Dismissed four including two sub-inspectors | डॉक्टरकडून १० लाख उकळण्याचा प्रयत्न : दोन उपनिरीक्षकांसह चौघे डिसमिस
डॉक्टरकडून १० लाख उकळण्याचा प्रयत्न : दोन उपनिरीक्षकांसह चौघे डिसमिस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका डॉक्टरला कारवाई तसेच बदनामीचा धाक दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांना सेवेतून निष्कासित (डिसमिस) करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गैरप्रकाराची गय करणार नाही, असा इशारा या कारवाईतून दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण घोडाम, रवीराज हलामी तसेच पोलीस शिपायी संदीप धोंगडे आणि तुषार सोनोने अशी निष्कासित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
प्रकरण ४ वर्षांपूर्वीचे आहे. २०१५ मध्ये हे चौघे प्रतापनगर ठाण्यात कार्यरत होते. या चौघांनी संगनमत करून प्रतापनगरातील एका डॉक्टरकडे रात्रीच्या वेळी धडक दिली होती. तुमच्याकडे गैरप्रकार चालतात, अशी धमकी दाखवून डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांना कोठडीत टाकण्याचा धाक दाखवला होता. डॉक्टर यावेळी त्यांच्या घरी होते. त्यांचा एक कर्मचारी पोलिसांची डॉक्टरच्या चेंबरमध्ये समजूत काढत असताना या पोलिसांनी त्याला शिवीगाळ करून आपल्या वाहनात बसण्यास सांगितले. त्याला डॉक्टरला बोलविण्यास सांगितले. डॉक्टरने संपर्क साधला असता आरोपी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचे दडपण आणले. सोबत मीडिया आहे, त्यामुळे बदनामीही होईल, असा धाकही दाखवला. प्रकरण दाबायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपी म्हणाले. पोलिसांकडून प्रचंड दडपण आल्याने आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो, हे ध्यानात आल्यामुळे बदनामी टाळण्यासाठी डॉक्टरने रात्रीच्या वेळी आरोपी पोलिसांना ३ लाख रुपये दिले. तीन लाख मिळाल्यामुळे निर्ढावलेल्या आरोपी पोलिसांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. सात लाख रुपयांसाठी आरोपींनी डॉक्टरमागे तगादा लावला होता. रक्कम मागणारा पीएसआय घोडामची डॉक्टरने रेकॉर्डिंग केली. त्या आधारे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने सापळा रचून घोडामेला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. यानंतर या चौघांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीत पोलीस उपनिरीक्षक घोडाम, हलामी, शिपायी धोंगडे आणि सोनोने हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी शुक्रवारी रात्री सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी या चौघांना पोलीस सेवेतून बरखास्त करण्याचे आदेश काढले.
थेट बरखास्तीचा बडगा
कोणत्याही प्रकरणात आधी निलंबित केले जाते. नंतरच्या चौकशीत दोषी आढळल्यास त्या अधिकारी, कर्मचाऱ्याला सेवेतून बरखास्त केले जाते. या प्रकरणात घोडामला एसीबीने पकडल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. सध्या घोडाम आणि हलामी कंट्रोल रूममध्ये तर धोंगडे आणि सोनोने पोलीस मुख्यालयात संलग्न आहेत. आता प्रदीर्घ चौकशीत त्याच्यासह अन्य तिघांवर निलंबनाऐवजी थेट बरखास्तीचाच बडगा उगारण्यात आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हेगाराला धरले होते हाताशी
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक घोडाम, हलामी, शिपायी धोंगडे आणि सोनोने या चौघांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करताना कुख्यात गुन्हेगारालाही हाताशी धरले होते. अनेक गंभीर गुन्ह्यांचा आरोपी असलेला सूरज लोलगे याला सात लाख रुपयांची रक्कम आणण्यासाठी वारंवार डॉक्टरकडे पाठविले होते. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक घोडाम, हलामी, शिपायी धोंगडे आणि सोनोने या चौघांनी डॉक्टरच्या दवाखान्यात जाण्यापासून तो कारवाईचा धाक दाखवण्यापर्यंत कसल्याही प्रकारची नोंद स्टेशन डायरीत केली नव्हती.

 


Web Title: Try to extort 10 lakhs from the doctor: Dismissed four including two sub-inspectors
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.