भरोसा सेल ही नागपूरने राज्याला दिलेली भेट
By Admin | Updated: April 5, 2017 02:29 IST2017-04-05T02:29:00+5:302017-04-05T02:29:00+5:30
पीडित महिलांना दिलासा देतानाच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शहर पोलिसांनी निर्माण केलेला भरोसा सेल ही राज्याला नागपूर पोलिसांनी दिलेली महत्त्वपूर्ण भेट आहे

भरोसा सेल ही नागपूरने राज्याला दिलेली भेट
मुख्यमंत्री फडणवीस : उत्कृष्ट पोलीस सेवा अध्ययन केंद्राचे उद्घाटन
नागपूर : पीडित महिलांना दिलासा देतानाच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शहर पोलिसांनी निर्माण केलेला भरोसा सेल ही राज्याला नागपूर पोलिसांनी दिलेली महत्त्वपूर्ण भेट आहे, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सदर छावणी, येथील पटेल बंगल्यात (डीजी कॅम्प) नागपूर पोलिसानी सुरू केलेल्या उत्कृष्ट पोलीस सेवा अध्ययन केंद्राचे (एन कॉप्स एक्सलन्स) उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, अत्याधुनिक साधने व तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील सर्वोत्कृष्ट वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्ष मुंबई येथे कार्यान्वित झाला असून, त्याच धर्तीवर नागपूर व पुणे येथेदेखिल वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्ष निर्माण करण्यात येईल. शहर पोलिसांनी सुरू केलेल्या भरोसा सेल सकारात्मक प्रभावी व परिणामकारक कार्यशैलीमुळे अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात भरोसा सेल हा महत्त्वाचा उपक्रम निर्माण करण्यासाठी नागपूर पोलिसांनी केलेल्या कार्याचे त्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. नागपूर पोलिसांनी ही राज्याला दिलेली महत्त्वाची भेट ठरली , असेही ते म्हणाले.
या (एन कॉप्स) अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पोलीस विभागाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्याला मदत होईल. पोलीस दलाला अत्याधुनिक सोईसुविधांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र पोलीस विभागाची गुणवत्ता व विश्वासार्हता वाढल्यास आम्ही (पोलीस) जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करू शकू, असेही ते म्हणाले.
सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के पोलीस स्टेशन एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यासोबतच संपूर्ण रेकॉर्डचे डिजिटाायझेशन करण्यात येत आहे. या केंद्रातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्याचा नक्की फायदा होईल, असा विश्वासही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण वाढविण्यासाठी केवळ चांगले वकील लावून केस जिंकता येत नाही. त्यापेक्षा भक्कम पुरावे कसे गोळा करता येतील, त्याकडे लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्री फडवणीस यांनी यावेळी विशद केली. पोलिसांना मूलभूत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यात २४ फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि सायबर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी राज्यात ४२ सायबर लॅब तयार केल्या आहेत. त्यांचा गुन्ह्याचा तपास तातडीने लावण्यासाठी फायदा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभी करताना शिस्तप्रिय पोलीस दलातील भावनासुध्दा जिवंत असणे आवश्यक असल्याची महत्त्वाची बाब यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित पोलिसांच्या लक्षात आणून दिली. जनतेला आधार देण्याच्या कामामुळेच लोकांचे मतपरिवर्तन होऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सर्व नागरिकांना प्रभावी व उच्च दर्जाची सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पोलीस दलामध्ये संवेदनशीलता वाढविण्यावर आमचा भर असल्याचेही यावेळी माथूर यांनी म्हटले. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी शहर पोलिसांची गुणवत्ता संख्यात्मकरीत्या वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रास्ताविकातून सांगितले.(प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांचा सत्कार
उत्कृष्ट पोलीस सेवा अध्ययन केंद्राच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य शितल वंजारी, सहायक निरीक्षक अमोल दौंड यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस महानिरीक्षक मुत्याल, जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक शैलेश बलकवड़े, वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मर्तना पाटील तथा सुहास बावचे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक वाहतूक शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी आणि आभार प्रदर्शन सहपोलीस आयुक्त शिवाजी बोड़खे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.