ट्रक पळवून शिपायावर हल्ला आरोपीस पाच वर्षे कारावास
By Admin | Updated: November 7, 2015 03:31 IST2015-11-07T03:31:37+5:302015-11-07T03:31:37+5:30
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पारडी नाका भागातून ट्रक पळवून एका वाहतूक पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एका आरोपीला ...

ट्रक पळवून शिपायावर हल्ला आरोपीस पाच वर्षे कारावास
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पारडी नाका भागातून ट्रक पळवून एका वाहतूक पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एका आरोपीला शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
शिशुपाल गंगाधर पेलने (२७), असे आरोपीचे नाव असून तो कुही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र कोचे यांनी काम पाहिले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, फिर्यादी प्रवीणकुमार वैजनाथ पांडे (२७) हा ट्रकचालक आहे. तो टेलिफोन एक्सचेंज चौकातील हरजित बॉडी वर्क्स येथे राहतो. ७ जून २०१३ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने आपला सीजी - ०४-जेए-१६१५ क्रमांकाचा दहा चाकी ट्रक गोमती हॉटेलजवळ उभा केला होता. टपरीवर चहा घेऊन तो आपल्या ट्रकच्या केबिनमध्ये चढत असताना त्याला शिशुपाल याने धक्का देऊन खाली पाडले होते. त्यानंतर शिशुपाल हा ट्रक घेऊन भंडारा मार्गाने पळाला होता. जुना पारडी नाका चौक येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना ट्रकचालक पांडे याने या घटनेबाबत सांगताच वाहतूकचे पोलीस शिपाई संदीप देवशंकर गुप्ता यांनी हेड कॉन्स्टेबल अंबादास दुर्गे यांच्या आदेशान्वये मोटरसायकलने ट्रकचा पाठलाग सुरू केला होता. त्यांनी या ट्रकला कापसी येथील मोगा टायर्ससमोर रोखले होते. त्याच वेळी शिशुपाल हा ट्रकमधून उतरून पळून जाऊ लागताच संदीप गुप्ता यांनी त्याचा पाठलाग करून पकडले होते. मोठी झटापट होऊन आरोपीने गुप्ता यांच्या नाकावर ठोसा मारून पळ काढला होता. त्यांच्या नाकाचे हाड मोडून रक्तस्राव सुरू झाला होता. अशाही स्थितीत गुप्ता यांनी आरोपीला पकडून ठेवून हेड कॉन्स्टेबल दुर्गे यांना मोबाईलने कळवले होते. दुर्गे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन शिशुपाल याला पकडून कळमना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एन. बी. गावंडे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३९४ आणि ३३३ कलमांतर्गत प्रत्येकी ५ वर्षे सश्रम कारावास, १ हजार दंड, ३५३ कलमांतर्गत ३ महिने कारावास, ५०० रुपये दंड,अशी शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)