ट्रकची रुग्णवाहिकेला धडक
By Admin | Updated: June 3, 2015 02:42 IST2015-06-03T02:42:46+5:302015-06-03T02:42:46+5:30
भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. यात रुग्णवाहिकेतील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ट्रकची रुग्णवाहिकेला धडक
कन्हान : भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. यात रुग्णवाहिकेतील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आठजण गंभीर जखमी झाले. ही घटना कन्हान परिसरातील वराडा शिवारात सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
अन्नपूर्णा राजेंद्र मडावी (३४) व निशा सरजिव रावते अशी मृत महिलांची नावे आहेत तर जखमींमध्ये गीताबाई वरिया (५९), सुधीर रावतेल (३५), मोनीराम उईके, रुग्णवाहिका चालक जगदीश डोंगरे (५२), अतुल वरिया, रूपेश काकोडे, शुभम काटोले, सौरभ मानकर या आठ जणांचा समावेश आहे. मनसर येथील मॅग्नीज ओर लिमिटेड (मॉयल)ची एमएच-४०/वाय-२८०७ क्रमांकाची रुग्णवाहिका नागपूर येथून रुग्णांवर उपचार करून मनसरकडे परत येत होती.
दरम्यान,वराडा शिवारातील एका पेट्रोलपंपाजवळ गोंडेगाव खाणीतून कोळसा वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम-४०/७०५६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. यात रुग्णवाहिकेच्या चालकासह १० जण गंभीर जखमी झाले. जखमींना कन्हान येथील जे.एन. रुग्णालय व कामठीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अन्नपूर्णा मडावी व निशा रावतेल या दोन महिलांचा मृत्यू झाला. इतर आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कन्हान पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या परिसरातील अपघात वाढले असून आतापावेतो तिघांचा अपघाती मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी)