कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक दुभाजकावर आदळला
By Admin | Updated: July 7, 2014 01:07 IST2014-07-07T01:07:42+5:302014-07-07T01:07:42+5:30
कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटला व भरधाव ट्रक दुभाजकावर आदळला. यात आठ जनावरे मृत आढळली. ही घटना नागपूर- सावनेर मार्गावर दहेगाव (रंगारी) शिवारात

कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक दुभाजकावर आदळला
दहेगाव शिवारातील घटना : आठ जनावरांचा मृत्यू
खापरखेडा : कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटला व भरधाव ट्रक दुभाजकावर आदळला. यात आठ जनावरे मृत आढळली. ही घटना नागपूर- सावनेर मार्गावर दहेगाव (रंगारी) शिवारात रविवारी सकाळी घडली.
एमपी-०९/एचएफ-९१३८ क्रमांकाचा भरधाव ट्रक मध्य प्रदेशातून जनावरे घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, दहेगाव (रंगारी) शिवारात चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. हा ट्रक अंदाजे १०० मीटरपर्यंत फरफटत गेला. अपघात होताच ट्रकचालक व ट्रकमधील इतर व्यक्ती पळून गेल्या. माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी या ट्रकची पाहणी केली असता त्यात आठ जनावरे मृत आढळली. शिवाय, ट्रकमधील सहा जनावरे पळून गेली तर, ११ जनावरे दहेगाव येथील अंगद कोठे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली. या जनावरांवर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. या जनावरांना कोंडवाडा अथवा गो-शाला येथे पाठविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, कुणीही सहकार्य केले नाही, असे खापरखेडा पोलिसांनी सांगितले. हा ट्रक सदर जनावरे घेऊन नागपूर अथवा कामठी येथे जात असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाचपोर, लक्ष्मीप्रसाद दुबे, अमित उमाठे, सूरज परमार, गणेश सोनस्कर करीत आहे. (प्रतिनिधी)