देशी कट्ट्याच्या धाकावर ट्रकचालकास लुटले
By Admin | Updated: August 15, 2016 02:01 IST2016-08-15T02:01:54+5:302016-08-15T02:01:54+5:30
दुचाकीवरून आलेल्या चौघांनी देशी कट्ट्याच्या धाकावर ट्रकचालकास लुटले. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव शिवारात शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

देशी कट्ट्याच्या धाकावर ट्रकचालकास लुटले
चौघांना अटक : मौदा अंतर्गतच्या बोरगाव शिवारातील घटना
मौदा : दुचाकीवरून आलेल्या चौघांनी देशी कट्ट्याच्या धाकावर ट्रकचालकास लुटले. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव शिवारात शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी सदर चारही आरोपींना अटक केली असून यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
गुरुदेवसिंग ऊर्फ फिरकी बलविंदर सिंग (२५, रा. मुस्ताफाबाद, ता. बताळा, जि. गुरुदासपूर, पंजाब), विलास मूलचंद येळणे (१९, रा. तेलीमांगली, मौदा), गुरूमितसिंग बिंदर सिंग (२०, रा. सुधारा, जि. अमृतसर, ह.मु. मौदा) आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी प्रवीण हरिदास जामुनकर (३६, रा. आदर्शनगर, नागपूर) हा एमएच-४०/एएफ-६१७६ क्रमांकाच्या ट्रकने रायपूरकडून नागपूरकडे येत होता. दरम्यान, बोरगाव शिवारात ट्रकचालक प्रवीण व क्लिनर हे दोघेही ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून शौचास गेले. दरम्यान, एमएच-३१/सीसी-९०३७ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने आलेल्या चौघांनी ट्रकचालक व क्लिनरला देशी कट्टा व चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी करू लागले. ट्रकचालक प्रवीणने भीतीपोटी ट्रकच्या कॅबिनमधून आठ हजार रुपये काढून आरोपींना दिले. त्यानंतर चारही आरोपींनी तेथून पळ काढला.
लागलीच ट्रकचालक प्रवीणने टोल फ्री क्रमांक १०० वरून पोलिसांना घटनेबाबत सूचना दिली. याबाबत माहिती मिळताच, मौदा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करीत कढोली शिवारात चारही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३४ सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर धोपडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)