तामिळनाडूतील ट्रकचालकाला बिहारच्या कंटेनरचालकाने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:27+5:302021-01-17T04:08:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बिहारमधील मद्यधुंद कंटेनरचालकाने तामिळनाडूतील एका ट्रकचालकाला चिरडले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ...

A truck driver from Tamil Nadu was crushed by a container driver from Bihar | तामिळनाडूतील ट्रकचालकाला बिहारच्या कंटेनरचालकाने चिरडले

तामिळनाडूतील ट्रकचालकाला बिहारच्या कंटेनरचालकाने चिरडले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बिहारमधील मद्यधुंद कंटेनरचालकाने तामिळनाडूतील एका ट्रकचालकाला चिरडले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. आर. रवी (वय ५२) असे मृताचे नाव असून ते तामिळनाडूतील येरियाकुलम येथील रहिवासी होते.

आर. रवी आणि त्यांचे सहकारी ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून जबलपूर हैदराबाद महामार्गावर पांझरी टोल नाक्याजवळ चहा प्यायला गेले होते. चहा घेतल्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास ते आपल्या ट्रककडे जात असताना आरोपी प्यारेचंद सुखारी राय (वय ३६, रा. जलालपूरकाला, जि. गोपालगंज, बिहार) याने वेगात निष्काळजीपणे कंटेनर चालवून आर. रवी यांच्या ट्रकला मागून जोरदार धडक मारली. नंतर ट्रकला खेटून वेगात कंटेनर काढला. त्यामुळे ट्रक आणि कंटेनरच्यामध्ये सापडून आर. रवी चिरडले गेले. अपघातात ट्रक आणि कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. कन्हैया रमेश गव्हाणे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी प्यारेचंद राय याला पोलिसांनी अटक केली. तो दारूच्या नशेत टुन्न होता. नशेत त्याने अत्यंत धोकादायक पद्धतीने कंटनेर चालवून हा अपघात घडवला.

---

दोन दिवसांपूर्वीही केला होता अपघात

दोन दिवसांपूर्वी याच कंटेनरचा मध्य प्रदेशात अपघात घडला होता. आरोपीने तेथून तो कंटेनर जुजबी दुरुस्त करून परत आणला आणि एका निर्दोष ट्रकचालकाचा बळी घेतला. विशेष म्हणजे, एवढा भीषण अपघात घडूनही आरोपी कंटेनरचालकाला फारशी दुखापत झाली नसल्याचे बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी सांगितले.

----

---

Web Title: A truck driver from Tamil Nadu was crushed by a container driver from Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.