भक्ती, मनोरंजन अन् बाजारपेठेचा त्रिवेणी संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:27+5:302020-12-27T04:07:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : अनेक वर्षांपासून कावरापेठ आणि गांगापूर या उमरेड शहरातील जुन्या वस्तीकडे लोकप्रतिनिधींनी नेहमीच पाठ दाखविली. ...

भक्ती, मनोरंजन अन् बाजारपेठेचा त्रिवेणी संगम
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : अनेक वर्षांपासून कावरापेठ आणि गांगापूर या उमरेड शहरातील जुन्या वस्तीकडे लोकप्रतिनिधींनी नेहमीच पाठ दाखविली. यामुळे केवळ पुरातन भवानी मातेचे मंदिर हे एकमेव श्रद्धास्थान याकडे ‘ओढ’ निर्माण करणारे ठरत होते. आता या परिसरात विकास कामाचा धडाका सुरू असल्याने भक्तिसह मनोरंजन आणि बाजारपेठ असा त्रिवेणी संगम नजरेस पडत आहे. कावरापेठ परिसराचा चेहरामोहरा बदलत असल्याने अनेकांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, असे बोलले जात आहे.
काही महिन्यापूर्वी मल्टीप्लेक्सचे निर्माणकार्य पूर्णत्वाला आल्यानंतर परिसरात बाजारपेठही वाढल्याचे चित्र आहे. शिवाय, भवानी माता मंदिर परिसरात नगरपालिकेच्यावतीने विकास कामे सुरू आहेत. याठिकाणी दोन एकर परिसरात भव्य बगिचाचे कार्य जोरावर सुरू असून, याकरिता सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बगिचामध्ये जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जीम, मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळण्यासाठी जागा, विविध प्रकारच्या खेळांचे साहित्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल आदींचे निर्माणकार्य याठिकाणी युद्धस्तरावर सुरू आहे.
दुसरीकडे भवानी माता मंदिर जीर्णोद्धाराचेही कार्य सुरू असून, यामुळे संपूर्ण परिसराला आगळीवेगळी ओळख निर्माण होईल, अशी बाब अध्यक्ष सुभाष तिवारी, सचिव भरत रोकडे यांनी सांगितली. नवरात्राेत्सवात हजारो भाविकांची गर्दीसुद्धा या परिसरात उसळते. एकूणच भक्ती, मनोरंजन आणि बाजारपेठ अशी तिहेरी बाब या परिसराला नक्कीच चार चाॅंद लावेल, अशा प्रतिक्रिया नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया यांनी व्यक्त केल्या. पालिकेचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचीही बाब त्यांनी सांगितली.
....
पुलाची दुरुस्ती करा
पुलाची समस्या या परिसरात रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. असे असले तरी कुही मार्गाला खेटून असलेल्या पुलाचे योग्य बांधकाम न केल्याने याठिकाणी दिवसभर अनेकांना अपघाताचा सामना करावा लागतो. या पुलाची योग्य दुरुस्ती करून ही समस्या सोडवावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.