लोकमत न्यूज नेटवर्कहिवराबाजार : कमी दरात नवीन ट्रॅक्टर विकत घेऊन देण्याची बतावणी करीत चौघांनी सहा आदिवासी शेतकऱ्यांची ९ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) परिसरात नुकताच घडला असून, शेतकऱ्यांनी त्या चौघांची देवलापार पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली आहे.
फसवणूक करणाऱ्यांमध्ये नरेंद्र चंद्रभान वाळके, मयाराम कुमरे दोघेही (रा. बोथिया पालोरा, ता. रामटेक), देवदास खंडाते (रा. सीतापूर, ता. रामटेक), महेंद्र पंचम धुर्वे (रा. पवनी, ता. रामटेक) या चौघांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले नाही. चौघेही त्यांच्या गावांमधून बेपत्ता असल्याची माहिती तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी दिली.
या चौघांनी उपासराव तुकाराम कोडवते, चंद्रभान मायाराव वरठी, अशोक बिरजू नराठी, ओमप्रकाश सुंदरलाल भलावी, सुनील आनंदराव उईके, कुंजीलाल नरसू कुमरे या सहा शेतकऱ्यांना पवनी येथील महेंद्र धुर्वे याच्या घरी बोलाविले होते. त्याच्याच घरी जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे कार्यालय आहे. याच ठिकाणी चौघांनी या शेतकऱ्यांना कमी किमतीत ट्रॅक्टर विकत घेऊन देण्याची बतावणी केली. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे दोघांनी १ लाख ५० हजार रुपये, दोघांनी १ लाख ५५ हजार, एकाने १ लाख ७५ हजार आणि एकाने दोन लाख रुपये असे एकूण ९ लाख ८० हजार रुपये त्यांना दिले.
तीन महिने पूर्ण होऊनही ट्रॅक्टर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी त्या चौघांची वारंवार संपर्क करायला भेटायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी असंबंद्ध उत्तरे देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. नंतर मात्र भेटणे व फोन बोलणे बंद केले. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी त्या चौघांविरुद्ध देवलापार पोलिस ठाण्यात व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत.
पावत्यांवर कमी रक्कम नमूदउपासराव कोडवते व ओमप्रकाश भलावी यांनी प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपयांप्रमाणे तीन लाख रुपये दिले. त्या दोघांच्या पावत्यांवर प्रत्येकी १ लाख ३० हजार रुपये नमूद केले आहे. चंद्रभान वरठी व अशोक नराठी यांनी प्रत्येकी १ लाख ५५ हजार रुपयांप्रमाणे ३ लाख १० हजार रुपये दिले. त्यांच्या पावत्यांवर प्रत्येकी १ लाख ३० हजार रुपये, सुनील उईके यांनी १ लाख ७५ हजार रुपये देऊन त्यांच्या पावतीवर १ लाख ३० हजार रुपये, तर कुंजीलाल कुमरे यांनी दोन लाख रुपये देऊन त्यांच्याही पावतीवर १ लाख ३० हजार रुपये नमूद केले आहे. या सर्वांचे मिळून दोन लाख रुपये नेमके कशासाठी कमी नमूद केले, हे कळायला मार्ग नाही.
"संबंधित शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची आधी चौकशी केली जाईल. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे नोंदविले जातील. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे."- नारायण तुरकुंडे, ठाणेदार, देवलापार