आंबेडकरी विचारांतूनच आदिवासींचा विकास
By Admin | Updated: April 17, 2016 03:11 IST2016-04-17T03:11:54+5:302016-04-17T03:11:54+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाप्रमाणे आदिवासींनाही विकासाचा मंत्र दिला आहे ...

आंबेडकरी विचारांतूनच आदिवासींचा विकास
एम्बस : ऊर्मिला मॉर्को यांचे प्रतिपादन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाप्रमाणे आदिवासींनाही विकासाचा मंत्र दिला आहे परंतु ते संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कास धरीत एकजूट होण्याची गरज आहे. आंबेडकरी विचारातूनच आदिवासींचा विकास शक्य आहे, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ऊर्मिला मॉर्को यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आॅल इंडिया मूलनिवासी बहुजन समाज सेंट्रल संघ (एम्बस)तर्फे कस्तुरचंद पार्कवर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एम्बसचे नॅशनल आॅर्गनायझर विजय मानकर होते. भदंत धम्मसारथी आणि बळवंत मेश्राम व्यासपीठावर होते.
डॉ. मार्को म्हणाल्या,भारत स्वतंत्र होऊन ६५ वर्षे झाली आहेत. तरी दलित-आदिवासींवरील अन्याय दूर झालेला नाही. आजही दलित-आदिवासींवरच अन्याय का होतो. कारण आपण स्वत:ला असहाय समजतो. स्वत:ला असहाय समजू नका, एकजूट व्हा. आंबेडकरी विचरांची कास धरा.
प्रत्येक घरात बाबासाहेब जन्माला यायला हवेत, असेही त्या म्हणाल्या. विजय मानकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल हा देशात राष्ट्रीय समता दिवस म्हणून आणि जगात मानवतावाद व प्रबुद्धवाद दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रियंका नेताम, साक्षी फुलझेले, अनन्या हिंगवे आदी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रा. राजेंद्र मोटघरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विकास नगराळे, डॉ. प्रदीप नगराळे, जयश्री शेवारे यांनी संचालन केले. काही नकली नक्षलवादीही तयार झाले. सध्या देशात काही नकली नक्षलवादीसुद्धा तयार झाले आहेत, असे डॉ. मॉर्को म्हणाले. (प्रतिनिधी)
आज समारोप
डॉ. आंबेडकर जयंतीचा १७ तारखेला समारोप कार्यक्रम होईल. यावेळी डॉ. मीरा नंदा (अमेरिका), दलित व्हाईसचे संपादक वी.टी. राजशेखर (कर्नाटक), अल्पेश ठाकूर प्रमुख अतिथी राहतील. यावेळी वी.टी. राजशेखर व मीरा नंदा यांना संयुक्तपणे वैश्विक मानव सेवेसाठी तर जीन ड्रीज यांना राष्ट्रीय सेवेसाठी १ लाख २५ हजार रुपयाचा पुरस्कार प्रदान केला जाईल.