ठरलं! नागपुरात विधान परिषदेची लढत तिरंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 18:51 IST2021-11-26T16:48:55+5:302021-11-26T18:51:02+5:30
नागपूरची निवडणूक इतर मतदारसंघांप्रमाणे अविरोध होणार अशीच चर्चा दिवसभर सुरू होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांनी आणखी जोर पकडला; परंतु या जागेबाबत राजकीय पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही.

ठरलं! नागपुरात विधान परिषदेची लढत तिरंगी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील निवडणूक अविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले व आता रिंगणात तीन उमेदवार उरले आहेत. तिरंगी लढतीत कॉंग्रेस, भाजपच्या उमेदवारासह एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात कॉंग्रेसतर्फे रवींद्र भोयर व प्रफुल्ल गुडधे, भाजपतर्फे चंद्रशेखर बावनकुळे व अपक्षांमध्ये सुरेश रेवतकर तसेच मंगेश देशमुख यांचा समावेश होता. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत होती. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत प्रफुल्ल गुडधे तसेच सुरेश रेवतकर यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भोयर, बावनकुळे व देशमुख अशी तिरंगी लढत लढली जाणार आहे.
१२ वर्षांनंतर होणार मतदार
सन २०१५ साली या मतदारसंघातून गिरीश व्यास यांची अविरोध निवड झाली होती. २००९ साली कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक व भाजपचे अशोक मानकर यांच्यात लढत झाली होती. त्यात मुळक यांनी बाजी मारली होती. तब्बल १२ वर्षांनंतर या निवडणुकीत मतदान होणार आहे.
दिवसभर चर्चांना ऊत
दरम्यान, नागपूरची निवडणूक इतर मतदारसंघांप्रमाणे अविरोध होणार अशीच चर्चा दिवसभर सुरू होती. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांनी आणखी जोर पकडला; परंतु या जागेबाबत राजकीय पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही.