शिक्षेचा ट्रेंड बदलतोय!

By Admin | Updated: July 14, 2015 02:50 IST2015-07-14T02:50:05+5:302015-07-14T02:50:05+5:30

सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातही दोषसिद्ध आरोपींना शिक्षा देण्याचा ‘ट्रेंड’ बदलत

The trend of change is changing! | शिक्षेचा ट्रेंड बदलतोय!

शिक्षेचा ट्रेंड बदलतोय!

राहुल अवसरे ल्ल नागपूर
सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातही दोषसिद्ध आरोपींना शिक्षा देण्याचा ‘ट्रेंड’ बदलत असल्याचे दिसते. या न्यायालयांनी अलीकडेच दोन खटल्यात निकाल देताना आरोपींना भारी दंड सुनावून दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून अपराध पीडितांना देण्याचा आदेश दिलेला आहे. सत्र न्यायालयाने २ जून रोजी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्यात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुख्य आरोपी कुणाल जयस्वाल याला १ लाख आणि उर्वरित ३ आरोपींना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड सुनावून दंडाची एकूण रक्कम १ लाख १५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फौजदारी संहितेच्या कलम ३५७ अन्वये मोनिकाच्या कुटुंबीयांना देण्याचा आदेश दिला. यापूर्वीही सत्र न्यायालयांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) या कायद्यांतर्गत आरोपींना शिक्षा सुनावून भारी दंड सुनावलेला आहे आणि दंडाची रक्कम पीडितांना देण्याचा आदेश दिलेला आहे.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांची न्यायालयेही अपराध पीडितांना नुकसान भरपाई मिळण्याच्या हेतूतून सिद्धदोष आरोपींना भारी दंड सुनावून हा दंड पीडितास देण्याचा आदेश देत आहेत. पीडितांना हा मोठा दिलासा आहे. शिक्षेच्या या बदलत्या कलाची वकिलांमध्ये चर्चा होत आहे. यापूर्वी ही न्यायालये अधिक शिक्षा आणि कमी दंड सुनावत होती.

डॉक्टर दाम्पत्यावरील हल्ल्याचे प्रकरण
९ जुलै रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए.ए. ढुमणे यांच्या न्यायालयाने एका डॉक्टर कुटुंबीयांवरील हल्लाप्रकरणी डॉ. नलिनी कोलबा बारापात्रे, शोभा खोडवे, रश्मी खोडवे आणि मधुसूदन घोराडकर या चार आरोपींना प्रोबेशन आॅफ आॅफेन्डर अ‍ॅक्टअंतर्गत चांगल्या वर्तणुकीच्या हमीबाबत प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बंधपत्र लिहून घेतले. आदेशाचा भंग झाल्यास आरोपींना १ वर्ष कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तसेच आरोपींनी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला प्रत्येकी पाच हजार रुपये द्यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय इस्पितळातील सेवानिवृत्त सीएमओ डॉ. रामदास मेश्राम हे अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर येथील कोलबा बारापात्रे यांच्या घरी भाड्याने राहत असताना घर रिकामे करण्यावरून २० एप्रिल २००७ रोजी १०-१५ महिलांनी डॉ. मेश्राम यांच्या पत्नी कल्पना यांना घराबाहेर काढून आणि डॉ. मेश्राम यांना बेडरूममध्ये कोंडून घरातील सामान बाहेर काढले होते. यात कल्पना मेश्राम या जखमी झाल्या होत्या.

ग्रामपंचायत निवडणुकीवरून हल्ला प्रकरण
बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलार येथील ग्रामपंचायत निवडणुकीवरून एकाच कुटुंबातील तिघांवरील हल्लाप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डॉ. गौरी कवडीकर यांच्या न्यायालयाने ७ जुलै रोजी आरोपी विजय भगवान ठाकरे, यादव रामभाऊ ठाकरे, बंडू ठाकरे, विनोद शंकर ठाकरे आणि सुनील संपतलाल पारसे यांना प्रत्येकी ६ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. एकूण दंडाच्या रकमेपैकी ३० हजार रुपये या हल्ल्यातील जखमी भीमराव सोनारकर, त्यांचा मुलगा मिलिंद सोनारकर आणि पत्नी गंगाबाई सोनारकर यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. आरोपींनी हातात लाठ्या, भाल्याचे पाते घेऊन ३० एप्रिल २००४ रोजी हा हल्ला केला होता. हल्ल्यात तिघेही जखमी झाले होते. आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडक्यांची तावदानेही फोडली होती.

Web Title: The trend of change is changing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.