महाकवी कालिदासाचे पदस्पर्श शोधणारे ‘ट्रेकिंग’

By Admin | Updated: July 3, 2014 00:59 IST2014-07-03T00:59:12+5:302014-07-03T00:59:12+5:30

महाकवी कालिदासाने त्याची अजरामर रचना ‘मेघदूतम’ रामटेक परिसरात रचली. निश्चितच कालिदास रामटेक परिसरात फिरला असणार. कालिदासाला अभिवादन करताना त्याच्या साहित्यकृतींचा

'Trekking' looking for Mahavvy Kalidasa | महाकवी कालिदासाचे पदस्पर्श शोधणारे ‘ट्रेकिंग’

महाकवी कालिदासाचे पदस्पर्श शोधणारे ‘ट्रेकिंग’

महाकवी कालिदासाला अनोखी आदरांजली : सीएसी आॅलराऊंडरचा पुढाकार
नागपूर : महाकवी कालिदासाने त्याची अजरामर रचना ‘मेघदूतम’ रामटेक परिसरात रचली. निश्चितच कालिदास रामटेक परिसरात फिरला असणार. कालिदासाला अभिवादन करताना त्याच्या साहित्यकृतींचा अभ्यास आणि चर्चा केली जाते. त्याच्या भाषिक सौंदर्यावर संवाद होतो. पण निसर्गावर प्रेम करणाऱ्या साहसवीरांनी कालिदासाला अनोखी आदरांजली वाहिली. कालिदासाने मेघदूतममध्ये जे वर्णन केले आहे; त्यावेळी कशी स्थिती असेल, कालिदास कुठे गेला असेल, कसा फिरला असेल याची कल्पना करीत आषाढाचा पहिला दिवस कालिदासाची आठवण करीत त्याचा मार्ग धुंडाळत साहसवीरांनी ट्रेकिंगच्या माध्यमात घालविला.
कालिदासावर प्रेम करणाऱ्या या साहसवीरांनी दोन दिवस रामटेक परिसरात कड्याकपाऱ्यावरुन ट्रेकिंग केली. यात बच्चेकंपनीसह युवा आणि मध्यमवयीन ट्रेकरही सहभागी झाले होते. रामटेकजवळील सिंधुरागिरी पर्वतावर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या परिसरात कालिदासांनी मेघदूतची रचना केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या भिंतीवर ही रचना आहे. कालिदास आणि विदभार्ची नाळ या मेघदूतानेच जोडली. त्यातूनच काही वर्षांपूर्वी कालिदासांच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य कालिदास महोत्सव सुरू करण्यात आला. आषाढाचा पहिला दिवस मात्र कालिदासाचे स्मरण करून देणारा आहे. कालिदासाला अभिवादन करताना सीएसी आॅलराऊंडर या साहसी संस्थेने थेट कालिदासाच्या पदचिन्हांचीच शोधमोहीम हाती घेतली.
कालिदासाचे स्मरण एका दिवसापुरते मर्यादित न राहता कालिदासांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात म्हणून त्यांनी वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. आमदार आशिष जयस्वाल यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी ट्रेकिंगने केली. सीएसीच्या साईटवरून ट्रेकिंगला सुरुवात झाली. त्रिविक्रम मंदिर, कालिदास स्मारक, गडमंदिर, कर्पूरबावडी, सिंधुरागिरी पर्वत अशा ज्या ज्या परिसरात कालिदासांनी वास्तव्य केले, तो संपूर्ण परिसर साहित्य, कला, संस्कृती व निसर्गाबद्दल प्रेम असणाऱ्या रसिकांनी ट्रेकिंग करीत पिंजून काढला. सिंधुरागिरी पर्वतावरून दिसणारा अंबाळा तलाव, खिंडसी आणि या परिसरातील निसर्गदर्शन त्यांनी घेतले. सिंधुरागिरी पर्वतावरून दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रेकिंगमध्ये सहभागी रसिकांनी हा संपूर्ण पर्वत पिंजून काढून खिंडसी बॅकवॉटरने सीएसी साईटवर परत आले. काहींनी कालिदास स्मारकांच्या भिंतीवरील मेघदूताचे वाचन केले. रसिकांच्या ट्रेकिंगच्या उत्साहाला वातावरणानेसुद्धा साथ दिली.(प्रतिनिधी)

Web Title: 'Trekking' looking for Mahavvy Kalidasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.