राज्यातील वृक्षलागवड मोहीम यंदाही उद्दिष्टाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST2021-07-22T04:07:26+5:302021-07-22T04:07:26+5:30
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अस्तित्वात आणली. त्यात पाच वर्षांसाठी ५० कोटी ...

राज्यातील वृक्षलागवड मोहीम यंदाही उद्दिष्टाविना
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अस्तित्वात आणली. त्यात पाच वर्षांसाठी ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असले, तरी यंदाही ही योजना उद्दिष्टाविनाच राबविली जात आहे. कोरोना संक्रमणामुळे सलग दोन वर्षांपासून ही योजना दुर्लक्षित झाली आहे.
भाजप-सेना युतीच्या काळामध्ये २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीची योजना राबविण्यात आली होती. त्याची उद्दिष्टपूर्ती करून गिनीज बुकमध्येही नोंद झाली होती. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी २०२० ते २०२४ या काळात ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना राबविण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी वर्षाला १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले होते. मात्र, पुढील घटनाक्रमात राठोड यांचे मंत्रिपद गेले. कोरोनामुळे योजना प्रभावित झाली. यंदा तर वृक्षलागवडीचे उद्दिष्टच आखून देण्यात आलेले नाही. असे असले तरी नियमित योजनांच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे काम जिल्ह्यात सुरू आहे.
...
सामाजिक वनीकरण आघाडीवर
जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेमध्ये यंदा नागपूर विभाग सामाजिक वनीकरण आघाडीवर आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या जिल्ह्यात १३ ठिकाणी १९ नर्सरी असून, यातून १ लाख ३० हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. सर्व रोपवाटिकांमध्ये २० ते २५ प्रजातींची झाले उपलब्ध असून, या आठवड्यापर्यंत एक लाख तीन हजार रोपट्यांची लागवड सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ग्रापमंचायतींनाही दरवर्षी साडेसात ते आठ लाख रोपांचा पुरवठा विभागाकडून केला जातो, अशी माहिती विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे यांनी दिली आहे.
...
नागपूर वनविभागाकडून २० हजार वृक्षलागवड
नागपूर वन परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मोहिमेत आतापर्यंत २० हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. वन विभागाच्या १५ नर्सरींमध्ये ८ लाख रोपे असून, १८ महिन्यांवरील २ लाख, तर ९ महिन्यांवरील ६ लाख रोपे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
...
शेतात बांधावर वृक्षलागवड अनुदान योजनाही सध्या बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून अनुदानच आलेले नाही. संसर्गजन्य महामारीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कित्येकांना प्राणास मुकावे लागले.