उपचार करणाऱ्यांनाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST2021-07-21T04:07:05+5:302021-07-21T04:07:05+5:30

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना, ‘हेल्थ केअर वर्कर्स’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चे १०० टक्के लसीकरण झालेले ...

Treatment threatens the third wave of corona | उपचार करणाऱ्यांनाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

उपचार करणाऱ्यांनाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना, ‘हेल्थ केअर वर्कर्स’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चे १०० टक्के लसीकरण झालेले नाही. दुसऱ्या डोससाठी उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५६ टक्के ‘हेल्थ केअर वर्कर्स’ तर, ३५ टक्के ‘फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस घेतले आहेत. उपचार करणाऱ्यांचेच संपूर्ण लसीकरण बाकी असताना, तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोनावर अद्यापही ठोस उपचार पद्धती नाही. यामुळे गंभीर परिणामांना रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. यामुळे १७ जानेवारीपासून सर्वच ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ केअर वर्कर्स’, तर दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ना प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला या दोन्ही गटात लसीकरणाबाबत भीती होती. परंतु नंतर ती दूर होताच वेग वाढला. जानेवारी ते जुलै यादरम्यान ६५,०५५ हेल्थ केअर वर्कर्सनी पहिला डोस घेतला. परंतु यापैकी केवळ ३६,८२८ वर्कर्सनी दुसरा डोस घेतला. तसेच ११८४१२ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला डोस घेतला असताना, निम्म्याहून कमी, ४१,५७७ वर्कर्सनी दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, ही संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडून किंवा संबंधित विभागाकडूनही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. संभाव्य तिसऱ्या लाटेत या दोन्ही गटात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

- वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच जनजागृतीची गरज

हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंटलाईन वर्कर्समध्ये दुसऱ्या डोसप्रती उदासीनतेचे कारण स्पष्ट झाले नाही. यातील अनेकांना कोरोना होऊन गेल्याने, कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसमध्ये जवळपास ८५ दिवसांच्या कालावधीचे अंतर आल्याने किंवा तपासणीत वाढलेल्या अँटिबॉडीज पाहून किंवा गैरसमजापोटी दुसरा डोस घेण्यात आला नसल्याची शक्यता आहे. यामुळे ज्यांनी लस घेतलीच नाही किंवा दुसऱ्या डोसपासून अद्यापही दूर आहेत, त्यांच्यामध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

- दोन्ही गटातील लाभार्थ्यांचे सामान्य गटात लसीकरणाची शक्यता

लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ‘हेल्थ केअर वर्कर्स’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ना प्राधान्य देण्यात आले. त्यावेळी ‘को-विन’ अ‍ॅपवर नोंदणी झालेल्यांची नोंदणी केली जात होती. नंतर १८ वर्षांपासून पुढील वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. यामुळे या ‘हेल्थ’ व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ यांनी सामान्य गटात नोंदणी करून लसीकरण करून घेतले असावे. या दोन्ही गटांना लसीकरणाचे महत्त्व माहीत आहे.

- डॉ. संज़य चिलकर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग

:: हेल्थ केअर वर्कर्स

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या : ६५०५५

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या : ३६८२८

:: फ्रंट लाईन वर्कर्स

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या : ११८४१२

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या : ४१५७७

Web Title: Treatment threatens the third wave of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.