आमदार निवासात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार : कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:06 IST2020-07-06T21:05:02+5:302020-07-06T21:06:46+5:30
सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचे ‘आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंद करून कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

आमदार निवासात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार : कोविड केअर सेंटर सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचे ‘आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंद करून कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. विशेष म्हणजे, रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान मेडिकलने २२ तर सोमवारी १० असे ३२ रुग्ण, मेयोने आज १८ असे एकूण ५० रुग्ण या सेंटरमध्ये उपचाराला आहेत.
कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार वर्गीकृत करण्याचे ‘आयसीएमआर’ने नियम घालून दिले आहेत. त्यानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल करण्याच सूचना आहेत. त्यानुसार मेयो व मेडिकलमध्ये प्रत्येकी ६०० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ तयार केले. मात्र येथे सर्वच प्रकारच्या रुग्णांना ठेवले जात होते.‘एचडीयू’ व ‘आयसीयू’मध्ये सुद्धा लक्षणे नसलेली व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जात होते. अशा रुग्णांवर विशेष उपचाराची गरज नसताना त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळ खर्ची होत होता. अखेर गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आमदार निवासाला कोविड केअर सेंटर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हालचालींना वेग आला. क्वारंटाईन असलेल्या संशयित रुग्णांना १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुटी देत सेंटरसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करण्यात आल्या. सध्या इमारत क्रमांक ‘बी’मध्ये १०० खाटांचे हे सेंटर उभारण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्या मार्गदर्शनात डॉ. नितीन गुल्हाने आणि त्यांची चमू सेंटरमध्ये आपली सेवा देत आहेत.
मेयो, मेडिकलने तपासल्यावरच रुग्णाची ‘सीसीसी’मध्ये रवानगी
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची मेयो, मेडिकलने तपासणी करून त्यांनी रेफर केल्यावरच आमदार निवासाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये पाठविले जाणार आहे. या सेंटरमध्ये आरोग्य विभागासोबतच महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवक सेवा देणार आहेत. २४ तास ‘ऑनकॉलवर’ मेयो, मेडिकलचे डॉक्टर असणार आहेत. रुग्णाला लक्षणे दिसताच किंवा प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच तातडीने रुग्णवाहिकेतून मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याची सोय राहणार आहे.