गँगमनच्या उपचारात रेल्वे रुग्णालयाची हयगय
By Admin | Updated: April 24, 2016 03:16 IST2016-04-24T03:16:27+5:302016-04-24T03:16:27+5:30
मागील १४ दिवसांपासून कंबरेच्या हाडाला गंभीर दुखापत झालेल्या गँगमनची शस्त्रक्रिया रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गुरुवारी आणखी लांबणीवर टाकून...

गँगमनच्या उपचारात रेल्वे रुग्णालयाची हयगय
नागपूर : मागील १४ दिवसांपासून कंबरेच्या हाडाला गंभीर दुखापत झालेल्या गँगमनची शस्त्रक्रिया रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गुरुवारी आणखी लांबणीवर टाकून २५ एप्रिलला शस्त्रक्रिया करण्याचे ठरविल्यामुळे या कर्मचाऱ्याचा त्रास आणखीनच वाढला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत गँगमन घनशाम डाबरे ७ एप्रिलला रेल्वे रुळाची देखभाल करीत असताना रुळ ठेवण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या स्लिपरवर पडला. यात त्याच्या कंबरेच्या हाडाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु १५ दिवस उलटूनही संबंधित डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली नसल्यामुळे त्याचा त्रास आणखीनच वाढला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून अन्सारी नावाच्या खासगी डॉक्टरसोबत करार करण्यात आला आहे. डॉक्टरांनी घटनेच्या १० दिवसानंतर १८ एप्रिलला शस्त्रक्रिया करण्याची तारीख दिली. ही तारीख वाढवून २१ एप्रिल केली. २१ एप्रिलला प्राथमिक तपासणी केल्यानंतर पुन्हा त्यांना शस्त्रक्रियेसाठी २५ एप्रिल ही तारीख देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अन्सारी दोन दिवसांच्या सुटीवर गेले आहेत.
तिसरा दिवस रविवार असल्यामुळे आता घनशामवर सोमवारीच शस्त्रक्रिया होऊ शकणार आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टर सांगत आहेत. या साहित्याची व्यवस्था करण्याऐवजी शस्त्रक्रियेची तारीख वारंवार बदलण्यात आली. घनशामवर त्वरित उपचार न झाल्यास त्याला कायमचे अपंगत्व येऊन त्याची नोकरी जाऊ शकते, हे निश्चित.(प्रतिनिधी)