वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली

By Admin | Updated: February 3, 2017 02:38 IST2017-02-03T02:38:29+5:302017-02-03T02:38:29+5:30

लग्नाचे वऱ्हाड घेऊन कळमेश्वर मार्गे नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला ट्रॅक्टरने मागून धडक दिली.

The travelers' travels turned down | वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली

वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली

५ जण गंभीर जखमी : २० जणांना किरकोळ दुखापत
कळमेश्वर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन कळमेश्वर मार्गे नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ही ट्रॅव्हल्स उलटली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, अन्य २० जणांना किरकोळ दुखापत झाली. गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - १४ मैल बायपास मार्गावरील चौकात गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
गंभीर जखमींमध्ये गुणवंता ढोमणे (५४), परितोष बांगडकर (१८), महादेव टेकाडे (४६), रमेश रेवतकर सर्व रा. नरखेड यांच्यासह अन्य एकाचा समावेश असून, या पाचही जणांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या अपघातात आकाश खोडे (१४, रा. सावंगी, जिल्हा वर्धा), नामदेव रेवतकर (५९, रा. नरखेड), कृष्णाजी बारई (६०, रा. फेटरी) यांच्यासह अन्य १७ जणांना किरकोळ दुखापत झाली असून, या सर्वांवर कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व काही वेळाने त्यांना सुटी देण्यात आली.
नरखेड येथील शंकरराव टेकाडे यांचा मुलगा अमित टेकाडे याचा लग्नसमारंभ नागपूर येथे असल्याने संपूर्ण वऱ्हाडी एमएच-३१/इएम-०८७६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने नरखेडहून नागपूरला जात होते. ते नरखेडहून सकाळी ७ वाजता निघाले होते. ही ट्रॅव्हल्स कळमेश्वर - १४ मैल मार्गावरील बायपास चौकात पोहोचताच मागून भरधाव येणाऱ्या एमएच-४६/एफ-५१९५ क्रमांकाच्या टँकरने या ट्रॅव्हल्सला मागून जोरदार धडक दिली. त्यात पाच जण गंभीर व २० जण किरकोळ जखमी झाले. किंचाळण्याच्या आवाजामुळे एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये कामावर जाणाऱ्या कामगारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या कामगारांनी सर्व जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढले. गंभीर जखमींना नागपूरला हलविले तर किरकोळ जखमींना सुटी दिली. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

गतिरोधक तयार करण्याकडे दुर्लक्ष
कळमेश्वर बायपासवरील या चौकात वारंवार अपघात होतात. कारण, वाहनचालक कशाचीही तमा न बाळगता वेगात वाहने नेतात. याच ठिकाणी चार दिवसांपूर्वी अपघात झाला असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी या ठिकाणी दोन ट्रकची धडक झाली होती. त्यामुळे या चौकातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. यासाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनही दिले होते. परंतु, बांधकाम विभागाने या चौकात गतिरोधक तयार करण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Web Title: The travelers' travels turned down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.