प्रवासाचे बनावट बिल अंगलट
By Admin | Updated: February 13, 2015 02:24 IST2015-02-13T02:24:19+5:302015-02-13T02:24:19+5:30
एअर इंडियाच्या प्रवासाचे बनावट बिल सादर करण्याचा प्रयत्न केंद्रीय जल आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या अंगलट आला. पोलिसांनी या प्रकरणात ...

प्रवासाचे बनावट बिल अंगलट
नागपूर : एअर इंडियाच्या प्रवासाचे बनावट बिल सादर करण्याचा प्रयत्न केंद्रीय जल आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या अंगलट आला. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमरदीपसिंग असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते केंद्रीय जल आयोगात उप संचालक आहेत.
सेमिनरी हिल्स परिसरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात सिंग कार्यरत आहेत. रजा प्रवास सवलती अंतर्गत आॅक्टोबर २०१४ ला त्यांनी नागपूर ते बागाडोंगरा आणि परत नागपूर असा सहपरिवार (चारजण) विमान प्रवास केला. या कालावधीचे प्रवास बिल त्यांनी कार्यालयात सादर केली. एअर इंडियाच्या तिकिटात तफावत जाणवत असल्यामुळे कार्यालयातील वरिष्ठांनी एअर इंडियाला पत्र देऊन सिंग यांनी केलेल्या प्रवासाच्या तारखेच्या वेळी तिकिटांचे दर काय होते, त्याची चौकशी केली. ९२०० रुपये प्रति तिकिटांप्रमाणे ३६,८०० रुपये प्रवास भाड्याचे झाल्याचे त्यातून उघड झाले. प्रत्यक्षात सिंग यांनी प्रति तिकीट सुमारे २२ हजार रुपयाचे बिल (एका तिकिटामागे सुमारे १३ हजार जास्त) लावले होते. त्यांनी या प्रवासी बिलाच्या माध्यमातून शासनाला ५१,८२८ रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यामुळे कार्यालयाचे अधीक्षक दिवाकर मोतीराम रायपुरे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी बुधवारी सिंग यांच्या विरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली कलम ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर सिंग यांना अटक झालेली नव्हती. (प्रतिनिधी)