अधिवेशनात ट्रामाचे लोकार्पण!
By Admin | Updated: November 10, 2015 03:35 IST2015-11-10T03:35:27+5:302015-11-10T03:35:27+5:30
मेडिकलमध्ये बांधण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण हिवाळी अधिवेशनादरम्यान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अधिवेशनात ट्रामाचे लोकार्पण!
मेडिकल: संरक्षण भिंत व बाह्य विद्युतीकरणाचे काम शिल्लक
नागपूर : मेडिकलमध्ये बांधण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण हिवाळी अधिवेशनादरम्यान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु ट्रामाच्या संरक्षण भिंत आणि बाह्य भागातील विद्युतीकरणाचे काम मंजूर होऊनही अद्यापही पूर्ण झाले नसल्याने अधिष्ठात्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचा रक्तदाब वाढला आहे.
रस्ता अपघातातील जखमींसोबतच हृदयरोग आजाराच्या गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचा जीव वाचू शकतो. या उद्देशाने मेडिकलने ६,८८० चौ.मी. जागेवर ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाची योजना तयार केली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटी रुपयांमधून या सेंटरसाठी १२ कोटींचे काम मे महिन्यात पूर्ण झाले. मात्र, या दरम्यान तत्कालीन अधिष्ठात्यांनी प्रवेशद्वार, संरक्षण ंिभंत आणि बाह्य विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या निधीला प्रशासकीय मंजुरीसाठी पाठपुरावाच केला नाही. यामुळे काम थंडबस्त्यात पडले. विशेष म्हणजे, सुरुवातीला विद्युतीकरणासाठी ४ कोटी १० लाखांचा प्रस्ताव भाववाढीमुळे तो १८ कोटी ४० लाखांवर गेला. सुधारित प्रस्तावावर वरिष्ठस्तरावर झालेल्या बैठकीत सप्टेंबर महिन्यात मंजुरी मिळाली, मात्र अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण होण्यासाठी हालचाली वाढल्याने मेडिकल प्रशासनाचा रक्तदाब वाढला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल प्रशासनाने याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असून, उर्वरित कार्य तत्काळ पूर्ण करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)