कामठीतील कत्तलखान्याचे भांडेवाडीत स्थानांतरण

By Admin | Updated: October 13, 2014 01:13 IST2014-10-13T01:13:43+5:302014-10-13T01:13:43+5:30

कामठीतील वादग्रस्त कत्तलखाना भांडेवाडी येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत आहेत. जिल्हाधिकारी यासंदर्भात महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करणार आहे. मनपाने प्रस्तावाला

Transfer to the slaughterhouse of slaughter house | कामठीतील कत्तलखान्याचे भांडेवाडीत स्थानांतरण

कामठीतील कत्तलखान्याचे भांडेवाडीत स्थानांतरण

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव : हायकोर्टात दिली माहिती
नागपूर : कामठीतील वादग्रस्त कत्तलखाना भांडेवाडी येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत आहेत. जिल्हाधिकारी यासंदर्भात महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करणार आहे. मनपाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास ताबडतोब स्थानांतरणाची कार्यवाही केली जाईल. सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती दिली.
कामठीतील विद्यमान कत्तलखाना स्थानांतरित करण्याची कामठीवासीयांची मागणी आहे. कत्तलखाना वैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य असल्यामुळे उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एक याचिका डॉ. संदीप कश्यप व विवेकानंद ममतानी यांची, तर दुसरी याचिका आॅल इंडिया जमैतुल कुरेश संस्थेची आहे. कामठीतील कत्तलखाना स्थानांतरित करण्यासाठी गेल्यावर्षीपासून योग्य भूखंडाचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत अनेक भूखंडांबाबत विचार करण्यात आला. पण विविध कारणांमुळे एकावरही अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आता भांडेवाडीचा पर्याय पुढे आणला आहे. यावर ते उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांना समन्स
कत्तलखान्यासाठी मौजा खैरी येथील भूखंडाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मौजा खैरी येथे शासनाची ४.०३ हेक्टर (गट क्र. १७७) जमीन आहे. यासंदर्भात २८ मे २०१३ रोजी उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कामठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळविले होते. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी भूखंड मिळविण्यासाठी अनेक महिने काहीच प्रयत्न केले नाही. यामुळे न्यायालयाने मुख्याधिकाऱ्यांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार मुख्याधिकारी संजय रामटेके यांनी २२ जानेवारी २०१४ रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर केले होते.
याचिकाकर्त्यांची तक्रार
कामठीतील कत्तलखान्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. नियम धाब्यावर बसवून कत्तलखाना चालविला जात आहे. जनावरांचे निरुपयोगी अवयव शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्यात येत नाहीत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात अनेकांनी शासनाशी पत्रव्यवहार केला. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. कत्तलखाना अन्य ठिकाणी स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.
विविध प्रस्ताव बारगळले
मौजा खैरी येथे कत्तलखाना उभारण्यास ग्रामपंचायतने आक्षेप घेतला होता. प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांची मते विचारात घ्यावे लागतील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला आवश्यक वेळ मागून घेतला होता. परंतु हा विषय मार्गी लागला नाही. यानंतर कामठी तहसीलदारांनी सहा ते सात भूखंड सुचविले. त्यावरही एकमत झाले नाही. याचिकाकर्त्या संस्थेने ०.८१ हेक्टरचा भूखंड देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

Web Title: Transfer to the slaughterhouse of slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.