स्कायवॉक गजानन महाराज संस्थानला हस्तांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:49+5:302021-01-08T04:23:49+5:30
नागपूर : शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिर ते बाळापूर रोडवरील आनंद विहारपर्यंत बांधण्यात आलेला स्कायवॉक संत गजानन महाराज ...

स्कायवॉक गजानन महाराज संस्थानला हस्तांतरित करा
नागपूर : शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिर ते बाळापूर रोडवरील आनंद विहारपर्यंत बांधण्यात आलेला स्कायवॉक संत गजानन महाराज संस्थानला हस्तांतरित करण्यात यावा, याकरिता ॲड. फिरदोस मिर्झा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
उच्च न्यायालयात तीर्थक्षेत्र शेगावच्या सर्वांगीण विकासासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणात ॲड. मिर्झा न्यायालय मित्र आहेत. त्यांनी सदर अर्जाद्वारे स्कायवॉकशी संबंधित विविध मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून स्कायवॉक बांधला आहे. सध्या स्कायवॉकच्या देखभालीची जबाबदारी कुणाकडेच नाही तसेच, स्कायवॉक निरूपयोगी पडला आहे. त्यामुळे असामाजिक तत्त्व स्कायवॉकचे नुकसान करू शकतात, असे होऊ नये याकरिता स्कायवॉकची नियमित देखभाल व सुरक्षा उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्कायवॉक संस्थानकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे, पण त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी, न्यायालयाने याविषयी आदेश जारी करावेत, अशी विनंती ॲड. मिर्झा यांनी न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने गुरुवारी हा अर्ज रेकॉर्डवर घेऊन आवश्यक आदेश देण्यासाठी प्रकरणावर दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली.