अमरावती कृषी सहसंचालकांची बदली
By Admin | Updated: July 9, 2014 00:54 IST2014-07-09T00:54:03+5:302014-07-09T00:54:03+5:30
अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांची बदली करण्यात आली आहे. ते अद्याप नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असले तरी त्यांच्या जागेवर शिवराज सरदार परस्परच रूजू झाले आहेत.

अमरावती कृषी सहसंचालकांची बदली
शिवराज सरदार परस्पर रुजू : अशोक लोखंडे नियुक्तीच्या प्रतीक्षेत
यवतमाळ : अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांची बदली करण्यात आली आहे. ते अद्याप नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असले तरी त्यांच्या जागेवर शिवराज सरदार परस्परच रूजू झाले आहेत.
अशोक लोखंडे यांनी आपल्या कार्यकाळात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके जप्तीची धडक मोहीम राबविली. यावर्षी सुमारे ३० कोटी रुपयांचे बोगस बियाणे-खते जप्त करून दहा पोलीस ठाण्यात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही मोहीम जोरात असतानाच अचानक सोमवार दि. ७ जुलै रोजी लोखंडे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांच्या जागेवर शिवराज सरदार यांना नियुक्ती देण्यात आली. वास्तविक लोखंडे यांना आदिवासी विकास विभाग नाशिक येथे अप्पर आयुक्त (एटीसी) म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची शासनाची योजना होती. याबाबत चार महिन्यांपूर्वी लोखंडे यांची लेखी संमतीही घेतली गेली. या संमती पत्राच्या आधारेच सरदार यांची नियुक्ती करण्यात आली.
लोखंडे यांच्या ‘रिक्त होणाऱ्या’ जागेवर असा स्पष्ट उल्लेख करून सरदार यांची सशर्त नियुक्ती करण्यात आली. मात्र लोखंडेंची जागा रिक्त होण्यापूर्वीच सरदार यांनी परस्परच एकतर्फी पदभार घेतला.
याबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी अशोक लोखंडे यांची प्रतिक्रिया संपर्क करूनही मिळू शकली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
लोखंडे मंत्रालयात, सरदार त्यांच्या खुर्चीत
अशोक लोखंडे ७ जुलै रोजी बैठकीसाठी मुंबईला गेले होते. हीच संधी साधून सरदार यांनी अमरावतीत लोखंडे यांच्या खुर्चीचा ताबा घेतला.
अमरावती ‘जेडीए’साठी औरंगाबादमधून फिल्डींग
अमरावतीच्या कृषी सहसंचालक (जेडीए) पदावर वर्णी लावून घेण्यासाठी शिवराज सरदार यांनी थेट औरंगाबादमधून फिल्डींग लावली. तेथे सहसंचालक पदावर साडेतीन वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना पुणे आयुक्तालयात नियुक्ती देण्यात आली. मात्र त्यांनी तेथे रुजू न होता सुमारे वर्षभर ‘आजारी’ रजेवर राहून औरंगाबादच्या ‘सत्ता’धारी नेत्याकडून ‘सेटींग’ करीत अमरावतीत नियुक्ती मिळविण्यात अखेर यश मिळविले.