‘ट्रामा’चा ‘ड्रामा’ सुरूच !
By Admin | Updated: May 19, 2016 02:42 IST2016-05-19T02:42:29+5:302016-05-19T02:42:29+5:30
अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या मेडिकलचे ‘ट्रॉमा केअर सेंटर’अखेर बुधवारपासून प्रायोगिक स्तरावर सुरू होणार होते.

‘ट्रामा’चा ‘ड्रामा’ सुरूच !
नागपूर : अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या मेडिकलचे ‘ट्रॉमा केअर सेंटर’अखेर बुधवारपासून प्रायोगिक स्तरावर सुरू होणार होते. परंतु प्रत्यक्षात प्रक्रिया सुरूच होऊ शकली नाही. या केंद्रात अगोदर रुग्णांना भरती करण्याची सुविधा विकसित केली जाईल. त्यानंतर येथे आकस्मिक विभाग सुरू करण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर शस्त्रक्रियेसाठी दोन रुग्णांना ‘ट्रॉमा सेंटर’मध्ये ठेवण्यात येईल. गुरुवारपासून ‘ट्रायल’ सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारी मेडिकल कॉलेजमध्ये ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या तयारीची समीक्षा करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची बैठक बोलविण्यात आली होती. यात ‘ट्रॉमा’चे उद्घाटन व उर्वरित राहिलेल्या कार्यांवर चर्चा करण्यात आली. मेअखेरपर्यंत ‘ट्रॉमा’च्या उद्घाटनाचा मुहूर्त निघेल, अशी शक्यता आहे. मेडिकलसाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अनेक अडचणींनंतर याचे काम जवळपास पूर्ण व्हायला आले आहे. आजच्या तारखेत याचे काम व्यवस्थितपणे सुरू करण्यासाठी ‘मॅनपॉवर’सोबतच ‘मनीपॉवर’चीदेखील आवश्यकता आहे. राज्य शासनाने याकडे लक्ष दिले तर ‘ट्रॉमा’चे दिवस फिरतील, अन्यथा साधारण वॉर्ड म्हणूनच याची गणना होईल.
‘ट्रॉमा केअर’च्या निर्माणकार्याची गुणवत्ता उच्चस्तरीय आहे. वॉर्ड व विभागाला वातानुकूलित बनविण्यात आले आहे. ‘ट्रॉमा केअर’ला १०० खाटांचे बनवायचे आहे. १०० खाटांचे असलेले ट्रॉमा केअर सेंटर मनुष्यबळ मिळेपर्यंत ३० खाटांचे राहणार आहे. यात तळमजल्यावर १० खाटांचा आपत्कालीन विभाग, पहिल्या मजल्यावर १० खाटांचा अतिदक्षता विभाग तर दुसऱ्या मजल्यावर १० खाटांचा वॉर्ड असणार आहे. ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या प्रवेशद्वाराचा आराखडा आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. रुग्णवाहिका थेट आत जाऊ शकणार आहे. परिसरात ‘पार्किंग’ची पर्याप्त व्यवस्था करण्यात आली आहे.
‘ट्रायल’ची माहिती मिळताच काही लोक बुधवारी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ला पोहोचले. परंतु तेथे शांतता होती. प्रवेशद्वाराजवळ काही मोटरसायकल व कार उभी होती. दाराच्या एका भागाला कुलूप लागले होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने ‘सेंटर’मध्ये प्रवेश केला तर ‘रिसेप्शन काऊंटर’वरदेखील कुणीच नव्हते. जवळच काही कामगार सुधारणा कार्य करत होते. तेथे असलेल्या परिचारिकांनादेखील ‘ट्रायल’बाबत काहीही माहिती नव्हती. ‘आॅक्सिजन लाईन’ देखील कुठेही नसून सुधारणा सुरूच आहे. त्यामुळे बुधवारी ‘ट्रायल’ सुरू होऊ शकली नाही.(प्रतिनिधी)
तयारी पूर्ण, ‘आॅक्सिजन’ची कमतरता नाही
‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या रुग्णांना भरती करून त्यांचे उपचार करण्यात येतील. येथे आकस्मित विभाग तूर्तास सुरू होणार नाही. रुग्णांवर येथे थेट उपचार होणार नाही. ‘सर्जरी कॅज्युअल्टी’मधून दोन रुग्णांना अगोदर ‘ट्रॉमा’मध्ये भरती करण्यात येईल. बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी सकाळी रुग्णांना येथे आणले जाईल. सध्या ‘आॅक्सिजन’ची कुठलीही कमतरता नाही. मोठे ‘सिलेंडर’ ठेवण्यात येणार आहेत. ‘आॅक्सिजन लाईन’देखील टाकण्यात येत आहे. उद्घाटनाची तारीख अद्याप अंतिम झालेली नाही, असे अधिष्ठाता डॉ.अभिमन्यू निसवाडे यांनी सांगितले.