नरेश डोंगरे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या वर्धा-बल्लारशाह सेक्शनमध्ये ताडाली आणि माजरी दरम्यान नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या रेल्वेच्या थर्ड लाईनचे ऑडिट वजा निरीक्षण शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या मार्गावर ताशी १३० च्या स्पीडने रेल्वे गाडी चालविली जाणार आहे. या हायस्पीडमध्ये या लाईनवरून ट्रेन कशी जाते, त्याची तपासणी कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) करणार आहेत.
रेल्वेच्या आधुनिकीकरण आणि विस्तारित नेटवर्क अंतर्गत शेकडो कोटी खर्चून थर्ड, फोर्थ लाईनचे काम केले जात आहे. अशाच प्रकारे ताडाली आणि माजरी दरम्यान मोठा खर्च करून थर्ड रेल्वे लाईन तयार करण्यात आली आहे. या लाईनवरून ट्रेन स्पीडमध्ये सुरक्षितपणे धावू शकेल का, त्याची तपासणी करण्यासाठी शुक्रवारी १० जानेवारीला ट्रायल रन पार पडणार आहे. रेल्वेच्या अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पीड ट्रायलचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ५.३० ते ६.१५ या वेळेत होणार आहे. ताशी १३० वेगाने ट्रेन यावेळी धावेल आणि ट्रायल कॅरेज तसेच ऑब्झर्वेशन कार विंडो यावेळी मुंबईच्या दिशेने माजरीकडे राहणार आहे. सिक्युरिटी प्रोटोकॉलवर यावेळी मुख्यत्वे भर दिला जाणार आहे. सुरक्षेची उच्च मानके तपासल्यानंतर ट्रायल रन यशस्वी झाली तर रेल्वेच्या या मार्गावरील संचालनाला अधिक गती मिळेल. त्यामुळे रेल्वे गाड्या रेंगाळण्याच्या अथवा उशिरा धावण्याचे प्रमाण कमी होईल.
नागरिकांना आवाहन
या हाय स्पीड ट्रायलच्या वेळी रेल्वे लाईनच्या आजुबाजुला राहणाऱ्या आणि त्यावेळी ट्रॅक जवळ असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रायलच्या वेळेत कुणीही ट्रॅकजवळ जाऊ नये किंवा ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.------------------