लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावर सुरू असलेली वर्धा-कळंब-वर्धा पॅसेंजर ट्रेन आता डिझेल इंजिन ऐवजी विजेवर (ईलेक्ट्रिक ट्रॅक्शन) धावणार आहे. आजपासून हा पर्यावरण पूरक बदल झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
विदर्भ-मराठवाड्यात विकासाचा नवा सेतू निर्माण करणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाचा एक टप्पा फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण झाला. अर्थात वर्धा-देवळी-कळंब या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर मात्र या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. दरम्यान, सुरू झालेली वर्धा-देवळी-कळंब रेल्वे गाडी आतापर्यंत डिझेल इंजिनवर धावत होती. आता मात्र वर्धा-कळंब-वर्धा मार्गावरील प्रवासी गाडी क्रमांक ५१११९/५११२० चे डिझेल इंजिनवरून इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
आज रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी वर्धा येथून २९ ऑगस्ट २०२५ पासून धावायला सुरुवात झाली तर कळंब येथून ३० ऑगस्टपासून नव्या इलेक्ट्रिक इंजिनसह ती धावणार आहे. मध्य रेल्वेकडून गेल्या दोन वर्षापासून ऊर्जा कार्यक्षमता, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने पावले उचलली जात आहेत. वर्धा-कळंब मार्गावरील ट्रॅक्शन बदलाची प्रक्रिया हे त्याचेच एक उदाहरण आहे. भविष्यात प्रवाशांना आधुनिक आणि जागतिक दर्जाची सेवा देण्याचे रेल्वेकडून कसोशिचे प्रयत्न सुरू असून, हा बदल त्याचेच प्रतिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
नागपूर विभागाने केलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे आता रेल्वेचा प्रवास पर्यावरण पूरक तसेच अधिक सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. विजेवर चालणाऱ्या या ट्रेनमुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होणार असून, कार्बन उत्सर्जनातही घट होणार आहे. त्यामुळे स्वच्छ व हरित पर्यावरणाला चालना मिळणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
खर्चातही होणार बचतरेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमुळे डिझेलवर होणारा रेल्वेचा लाखोंचा खर्च वाचणार आहे. शिवाय देखभाल खर्चातही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. शिवाय इंजिनमधील तांत्रिक बिधाडांचे प्रमाण कमी होऊन, प्रवाशांना अधिक विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.