आरोग्य कर्मचाऱ्यांचे ७ जूनपासून प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST2021-06-02T04:07:08+5:302021-06-02T04:07:08+5:30
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन एकीकडे ग्रामीण भागात जनजागृती अभियान करीत आहेत, तर दुसरीकडे ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचे ७ जूनपासून प्रशिक्षण
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन एकीकडे ग्रामीण भागात जनजागृती अभियान करीत आहेत, तर दुसरीकडे नेमक्या व प्रभावी वैद्यकीय उपचारासाठी अधिकार्यांचे देखील प्रशिक्षण निश्चित करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे ७ ते १८ जून या कालावधीत विशेष प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, विषेशतः लहान मुलांची अतिजोखीम लक्षात घेता, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या प्रशिक्षणाची आखणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, प्रशिक्षणात नागपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका याप्रमाणे जवळपास एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहभागी करण्याचे निश्चित केले आहे. हे प्रशिक्षण ७ जून ते १८ जून या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सदर प्रशिक्षण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, लता मंगेशकर हॉस्पिटल या तीन संस्थेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी चाळीस याप्रमाणे तीन संस्थांमध्ये दर दिवशी १२० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. प्रशिक्षण सत्र भूलतज्ज्ञ विभागात सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.
याबाबत नुकतीच २८ मे रोजी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. भारसाकडे, डॉ. वैशाली शेलगावकर, डॉ. अंजली भुरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.